‘व्हायब्रंट गुजरात’चा २० वर्षांत महाकाय वृक्ष झाल्याचे गौरवोद्गार
पीटीआय, अहमदाबाद : ‘‘भारताला जागतिक विकासाचे ‘इंजिन’ बनवणे हे आपले ध्येय आहे. आपला देश लवकरच जगातील आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल,’’ असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी व्यक्त केला. ‘व्हायब्रंट गुजरात परिषदे’ला २० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोदी बोलत होते. ते म्हणाले की, २० वर्षांपूर्वी त्यांनी ‘व्हायब्रंट गुजरात’चे छोटे बीज पेरले होते आणि आज त्याचा महाकाय वृक्ष झाला आहे. केंद्रातील तत्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) तत्कालीन केंद्र सरकार राज्याच्या औद्योगिक प्रगतीबाबत ‘उदासीन’ असताना ‘व्हायब्रंट गुजरात’ यशस्वी झाले होते.




गुजरातला भारताच्या विकासाचे इंजिन बनवण्यासाठी आम्ही ‘व्हायब्रंट गुजरात’चे आयोजन केले. देशाने हे स्वप्न साकारताना पाहिले. २०१४ मध्ये जेव्हा माझ्याकडे देशाची सूत्रे सोपवण्यात आली, तेव्हा भारताला जागतिक विकासाचे इंजिन बनवणे हे माझे ध्येय होते. मोदींनी सांगितले, की देश अशा वळणावर आहे, की तो लवकरच जागतिक आर्थिक महासत्ता म्हणून उदयास येईल. जागतिक स्तरावरील संस्था आणि तज्ज्ञही याचे संकेत देत आहेत. काही वर्षांतच तुमच्या डोळय़ांसमोर, भारत जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांपैकी एक होईल, ही मोदींची हमी आहे. भारताला अधिक प्रबळ बनवणाऱ्या कोणत्या नवीन क्षेत्रात संधी आहेत, हे शोधण्याचे आवाहन मोदींनी देशातील उद्योग क्षेत्राला केले. ‘व्हायब्रंट गुजरात’द्वारे ही मोहीम कशी अधिक गतिमान करता येईल, याचाही विचार व्हावा.
‘व्हायब्रंट गुजरात’ उपक्रमाचा साध्या पद्धतीने प्रारंभ झाला. त्याला एका भव्य संस्थेचे रूप कसे प्राप्त झाले, या उपक्रमाचा झालेला विस्तार आणि त्यानंतर अनेक राज्यांनी त्याचे अनुकरण करून गुंतवणूक परिषदा आयोजित केल्या, यावर मोदींनी प्रकाश टाकला. ‘व्हायब्रंट गुजरात’च्या यशाच्या विविध टप्प्यांचा उल्लेख करताना मोदी म्हणाले, की स्वामी विवेकानंद म्हणाले होते, की प्रत्येक काम तीन टप्प्यांतून जाते – प्रथम त्याची थट्टा केली जाते, नंतर त्यास विरोधाचा सामना करावा लागतो आणि शेवटी ते स्वीकारले जाते. विशेषत: जेव्हा काही कल्पना काळाच्या पुढच्या असतात, तेव्हा त्यांना असे तोंड द्यावे लागते.
‘व्हायब्रंट गुजरात’चे यश आज जगाला दिसत आहे; परंतु जेव्हा ते आयोजित केले गेले तेव्हा तत्कालीन केंद्र सरकारने गुजरातच्या विकासाबाबत उदासीनता दाखवल्याची टीका करून मोदी म्हणाले, की मी नेहमीच गुजरातच्या विकासाद्वारे भारताच्या विकासाचीच चर्चा केली; पण केंद्रात सत्तेत असलेल्यांनी गुजरातच्या विकासाचा संबंध राजकारणाशीही जोडला होता. तत्कालीन केंद्रीय मंत्र्यांनी या परिषदेला उपस्थित राहण्यास नकार दिला होता. खासगीत होकार दिल्यानंतर नंतर श्रेष्ठींच्या दबावामुळे त्यांनी मला नकार दिला होता. सहकार्यही न करता माझ्यासमोर अडथळे निर्माण केले गेले. विदेशी गुंतवणूकदारांना गुजरातमध्ये गुंतवणूक करू नये, म्हणून धमकावण्यात आले; पण अशा धमक्या येऊनही, तत्कालीन गुजरातमध्ये कोणतीही विशेष अनुकूलता नसतानाही परदेशी गुंतवणूकदारांनी गुजरातला भेट दिली व गुंतवणूकही केली.
‘माझ्या सरकारतर्फे लाखो कन्या घरमालक’
‘‘माझ्या मालकीचे अद्याप कोणतेही घर नाही. मात्र माझ्या सरकारने देशातील लाखो कन्यांना घरमालक बनवले आहे,’’ असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. राज्यातील आदिवासीबहुल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोडेली शहरात शिक्षणक्षेत्राशी संबंधित साडेचार हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांसह पाच हजार कोटींहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते संबोधित करत होते. मोदी म्हणाले, आज मी समाधानी आहे कारण माझ्या सरकारने देशभरातील नागरिकांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत. पूर्वीच्या सरकारांप्रमाणे ‘गरिबांसाठी घर’ ही केवळ सांगण्यासाठीची आकडेवारी नाही. आम्ही गरिबांसाठी घरे बांधून त्यांना सन्मान मिळवून देण्याचे काम करत आहोत.