ताश्कंद : उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे झालेल्या ५८व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताने पहिल्यांदाच चारही सुवर्णपदके जिंकत इतिहास रचला. या स्पर्धेतील भारताची ही आजवरची सर्वोत्तम कामगिरी ठरली असून, प्रथमच भारतीय संघाने ‘ऑल गोल्ड’ कामगिरीची नोंद केली आहे.
यंदाच्या स्पर्धेत ९३ देशांतील ३६३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. देशनिहाय पदकतालिकेत चीन, व्हिएतनाम आणि वैयक्तिक सहभागी गट ब (रशिया) यांच्यासह भारत संयुक्तपणे अव्वल ठरला. भारतीय संघातील भुवनेश्वर (ओडिशा) येथील देबदत्त प्रियदर्शी, मंडी गोबिंदगड (पंजाब) येथील हर्षित सिंगला, दिल्ली येथील कबीर चिल्लर आणि हैदराबादमधील (तेलंगणा) संदीप कुची या चौघांनी सुवर्णपदके जिंकली.
भारतीय पथकाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. सुभजीत बंडोपाध्याय यांनी काम पाहिले. मुंबईतील होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या (एचबीसीएसई) डॉ. इंद्राणी सेन या मार्गदर्शक होत्या, तर आयआयटी खरगपूरचे डॉ. अनुबेंदू अधिकारी आणि मुंबईतील एनईएस रत्नम महाविद्यालयाच्या डॉ. जयश्री गोपालकृष्णन यांनी वैज्ञानिक निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
या स्पर्धेत सैद्धांतिक आणि प्रायोगिक अशा दोन स्वतंत्र परीक्षा घेण्यात आल्या. सैद्धांतिक परीक्षेत रासायनिक अभिक्रिया, उत्प्रेरके, कार्बनची नवी संरचना, वातावरणातील कार्बन डायऑक्साइडचे रूपांतर, अमोनिया निर्मिती, युरेनियम, जैवरसायनशास्त्र आदी विषयांवरील नऊ प्रश्नांचा समावेश होता. प्रायोगिक परीक्षेत धातूंची संयुगे तयार करणे, विविध जैवरासायनिक मिश्रणांची ओळख पटविणे आणि आम्ल मिश्रणांचे विश्लेषण अशा प्रयोगांवर विद्यार्थ्यांची कसोटी घेण्यात आली.
भारताचा आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधील हा २७वा सहभाग होता. या कालावधीत भारतीय विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या पदकांपैकी ३२ टक्के सुवर्ण, ५१ टक्के रौप्य आणि १७ टक्के कांस्य पदके आहेत. विशेष म्हणजे, गेल्या दहा स्पर्धांमध्ये भारताच्या विद्यार्थ्यांनी ४३ टक्के सुवर्ण आणि ५३ टक्के रौप्य पदके जिंकली आहेत.
पंतप्रधानांकडून अभिनंदन
आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये चारही भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके जिंकून इतिहास घडवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले. हा भारताचा या स्पर्धेतील आजवरचा सर्वोत्तम निकाल असून, देशातील युवा शक्ती जागतिक स्तरावर सातत्याने ठसा उमटवत असल्याचे त्यांनी म्हटले.
