सध्या भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती हा सराव कार्यक्रम सुरू असून हे सिद्ध झालंय की तशीच वेळ आली तर भारत पाकिस्तानी हवाई दलाच्या दुप्पट संख्येने लढाऊ विमानं तैनात करू शकतो. भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांनी सांगितलं की भारतानं कधी नव्हे एवढी म्हणजे 80 टक्के कार्यक्षमता लढाऊ विमानांच्या बाबतीत गाठली आहे.

इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना धनोआ म्हणाले की, “लढाऊ विमानांची उपलब्धी 80 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचं संपूर्ण श्रेय आपल्या इंजिनीअर्सना जातं. आपलं लक्ष्य 75 टक्के होतं, परंतु प्रत्यक्षात आपण 80 टक्के इतके लक्ष्य गाठल्याचं गगनशक्तीच्या सरावात लक्षात आलं आहे.” याचा अर्थ लष्करी कारवाईच्या वेळी ताफ्यात असलेल्या विमानांपैकी किती लढाऊ विमानं उड्डाणासाठी उपलब्ध असतील हे दर्शवणारी सिद्धता आहे.

या सरावानं हे ही सिद्ध केलं आहे की प्रत्यक्ष लढाईच्या वेळी भारताची आक्रमणाची क्षमता पाकिस्तानच्या दुप्पट असेल. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात 371 लढाऊ विमानं आहेत तर पाकिस्तानकडे 260 विमानं आहेत. वर उल्लेख केलेल्या कार्यक्षमतेच्या बाबतीतही भारत पाकिस्तानपेक्षा सरस ठरल्यामुळे आपली वास्तविक क्षमता पाकिस्तानच्या दुप्पट झाल्याचे हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

गगनशक्तीच्या सरावादरम्यान हे ही सिद्ध झाले की भारतीय हवाई दल दीर्घ पल्ल्याच्या मोहिमाही करू शकतं. दक्षिण अथवा पश्चिम किमाऱ्यावरील तळावर असलेली भारतीय हवाई दलाची विमानं तीन हजार किलोमीटर अंतरावरील लक्ष्यापर्यंत पोहोचू शकतात याचाही सराव करण्यात आला.
संरक्षण मंत्रालयाचा पाठिंबा असल्यामुळे तसेच या क्षेत्रातल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्ससारख्या सरकारी कंपन्यांच्या सहकार्यामुळे गगनशक्तीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं धनोआ म्हणाले आहेत.