‘तेजस’ हवाई दलात दाखल

स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान बनवण्याच्या प्रकल्पांना सुरुवात केल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी पहिले तेजस विमान शनिवारी भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले.

स्वदेशी बनावटीचे हलक्या वजनाचे लढाऊ विमान बनवण्याच्या प्रकल्पांना सुरुवात केल्यानंतर तब्बल ३२ वर्षांनी पहिले तेजस विमान शनिवारी भारतीय हवाईदलाच्या ताफ्यात दाखल झाले. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी त्याची कागदपत्रे हवाईदलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अरुप राहा यांच्या स्वाधीन केली.
या विमानाला शनिवारी दुसरी कार्यान्वयन परवानगी (इनिशियन ऑपरेशनल क्लिअरन्स-२) देण्यात आली. त्यानुसार हे विमान सर्व हवामानांत उड्डाणे करण्यास सक्षम असल्याचे प्रमाणित करण्यात आले. अशा प्रकारची पहिली परवानगी जानेवारी २०११ मध्ये मिळाली होती. तर अंतिम कार्यान्वयन परवानगी या वर्षअखेर मिळण्याची अपेक्षा आहे. शनिवारी कार्यान्वयन परवानगी मिळालेल्या विमानात अद्याप इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली, हवेत इंधन भरण्याची क्षमता आणि लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे डागण्याची क्षमता नाही. ती अंतिम कार्यान्वयन परवानगी असलेल्या विमानात असेल. हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडने तेजसची निर्मिती केली आहे. तेजसवरील शस्त्रास्त्रांसह विविध यंत्रणांच्या परीक्षणासाठी त्याच्या आजवर लेह, जामनगर, जैसलमेर, उत्तरलाई ग्वाल्हेर, पठाणकोट आणि गोवा येथे वेगवेगळ्या वातावरणांत अनेक चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
हवाईदलातील जुनी होत चाललेल्या रशियन बनावटीच्या मिग-२१ या विमानांची जागा घेण्यासाठी हलके लढाऊ विमान (लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट – एलसीए) बनवण्याचा प्रकल्प १९८३ साली हाती घेण्यात आला होता. मात्र अनेक कारणांनी ही विमाने प्रत्यक्ष हवाईदलात सामील होण्यास विलंब झाला. त्यावर आजपर्यंत ८००० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
हवाईदलात २०१७-१८ पर्यंत अशा प्रकारची २० विमाने दाखल करून पहिली तेजस स्क्वॉड्रन स्थापित करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च ३०,००० कोटी आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian air force gets first tejas light combat aircraft