Sukhoi Su-30 MKI Crashes : भारतीय हवाई दलाचं ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान आसामध्ये बेपत्ता झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी समोर आली होती. ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळातच रडारशी संपर्क तुटला होता. त्यानंतर भारतीय हवाई दलाने या घटनेची माहिती एक्सवरून दिली होती. तसेच या लढाऊ विमानाच्या शोधासाठी पथकेही रवाना करण्यात आली होती.

भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानाबाबत आता मोठी माहिती समोर आली आहे. ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळल्याची घटना घडली आहे. ही घटना घडल्यानंतर आता पुढील शोध मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती भारतीय हवाई दलाने दिली आहे.

भारतीय हवाई दलाने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, ‘सुखोई-३० एमकेआय’ हे लढाऊ विमान प्रशिक्षण मोहिमेवर होतं. मात्र, यावेळी अचानक या लढाऊ विमानाचा उड्डाणानंतर काही वेळात रडारशी संपर्क तुटला. त्यानंतर हे विमान आसाममधील जोरहाटपासून सुमारे ६० किमी अंतरावर असलेल्या कार्बी आंगलोंग जिल्ह्यात कोसळलं आहे.

या विमानात दोन वैमानिक होते. त्या वैमानिकाचा देखील शोध घेतला जात होता. मात्र, अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारतीय हवाई दलाने एक्सवरून दिली आहे. दरम्यान, या विमानाचा संपर्क नेमकं कशामुळे तुटला? हे हवाई दलाचं लढाऊ विमान कशामुळे कोसळलं? याचा तपास केला जाणार असल्याचं हवाई दलाने म्हटलं आहे.

हवाई दलाने काय म्हटलं?

“‘सुखोई-३० एमकेआय’ या लढाऊ विमानाच्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांच्या निधनावर भारतीय हवाई दल शोक व्यक्त करत आहे.भारतीय हवाई दलाचे सर्व कर्मचारी या दुःखाच्या वेळी त्यांच्या कुटुंबासोबत असून आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो”, असं भारतीय हवाई दलाने म्हटलं आहे.

२०२४ मध्येही सुखोई सु-३० एमकेआय झालं होतं क्रॅश

जून २०२४ मध्ये महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात सुखोई सु-३० एमकेआय बेपत्ता झाल्याची अशीच एक घटना समोर आली होती. दरम्यान, निफाडमधील शिरसगाव गावाजवळ हे विमान कोसळलं होतं. पण, पायलट आणि सह-पायलट सुरक्षितपणे बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते अशी माहिती तेव्हा हवाई दलाने दिली होती.

काय आहे सुखोई सु-३० एमकेआय?

दरम्यान, सुखोई सु-३० एमकेआय हे भारतीय हवाई दलातील लढाऊ विमान आहे. दोन आसनी हे लढाऊ विमान ट्विनजेट ४.५ क्षमतेचं आहे. रशियाच्या सुखोईने ते विकसित केलेलं आहे. भारतात एचएएल याची निर्मिती करते. सु-३० एमकेआयची ३००० किमी रेंज असून त्याच्यात ब्रह्मोस देखील डागण्याची क्षमता आहे.