Tejas Fighter Jet Crash at Dubai Air Show 2025 : मुंबई : गेली अनेक वर्षे बहुतेकदा नकारात्मक कारणांसाठीच चर्चेत, बातम्यांत राहिलेल्या तेजस लढाऊ विमानाला दुबई एअरशोमध्ये झालेला अपघात आणि त्यात झालेला वैमानिकाचा मृत्यू या दोन्ही घटना अतिशय निराशाजनक आणि दुःखद ठरल्या. भारतासाठी विशेष आपत्तीजनक बाब म्हणजे, स्वदेशी तंत्रक्षमतेचा आविष्कार म्हणून तेजस विमान आपण जगासमोर सादर करत असतानाच हा अपघात घडला.
गेल्या सप्टेंबर महिन्यात मिग-२१ या हवाईदलातील अत्यंत कळीच्या लढाऊ विमानाने शेवटचे प्रतीकात्मक उड्डाण केले आणि कित्येक वर्षे सेवा बजावलेल्या या विमानाला सन्मानाने निवृत्त करण्यात आले. लगेचच ऑक्टोबर महिन्यात विमानाच्या एका उपप्रकाराचे समारंभपूर्वक उड्डाण नाशिक येथून झाले. हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेडच्या नाशिक येथील कारखान्यात बेंगळूरुपाठोपाठ आणखी जुळणी केंद्र सुरू झाल्याचा क्षण साजरा करण्यासाठी ते होते. म्हणजे या विमानाचा प्रवास आता कुठे सुरू होत आहे. तो सुरू होत असताना आणि अद्याप नवीन तुकडी हवाईदलात दाखल झालेली नसतानाच अशा घटना घडू लागल्यास, एकंदरीत तेजस प्रकल्पाविषयीच अनेक प्रश्न उपस्थित होतात.
एअरशोतील दुर्घटना दुर्मीळ पण अटळ
बहुतेकदा एअरशो किंवा हवाई प्रदर्शनात लढाऊ विमानांच्या हवाई कसरती हे प्रमुख आकर्षण असते. या कसरतींमधून लढाऊ विमानांच्या मारक क्षमतेपेक्षाही चापल्याचे आणि लवचीकतेचे, तसेच वैमानिकाच्या कौशल्याचे सादरीकरण होते. पण या कसरती जोखमीच्या असतात. काही वेळा अपघात होऊ शकतो. लंडन, स्कारबरोसारख्या मोठ्या प्रदर्शनांमध्येही असे अपघात झालेले आहेत. यात एफ-१६ सारखे जुन्या पिढीतील, तसेच एफ-३५सारख्या नव्या पिढीतील विमानेही दुर्घटनाग्रस्त झालेली आहेत. प्रदर्शनात सहभागी होऊन कवायती सादर करणाऱ्या देशांना, वैमानिकांना जोखमीची पुरेपूर कल्पना असते. त्यामुळे तेजस विमानाला झालेला अपघात दुर्दैवी असला, तरी सर्वस्वी अकल्पित नव्हता.
तेजसबद्दल अजूनही विश्वास का नाही?
भारतीय हवाईदलास पहिल्या टप्प्यात ८३ तेजस एमके वन ए विमाने एचएलकडून मिळणे अपेक्षित होते. फेब्रुवारी २०२४पासून ही विमाने मिळणार होती. त्या आघाडीवर काहीच हालचाल दिसली नाही म्हणून हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग मध्यंतरी संतप्त झाले होते. ऑक्टोबरअखेरीस निर्धारित दोन लढाऊ विमानेही मिळू शकली नाहीत. अशा प्रकारे प्रलंबित हस्तांतर हे संपूर्ण तेजस प्रकल्पाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करते. कारण हव्या त्या वेळी हव्या त्या प्रमाणात ही विमाने मिळणार नसतील, तर त्यांच्यावर इतका खर्च करून हाती काय लागले याचे उत्तर सरकार आणि हिंदुस्थान एरॉनॉटिक्सलाही द्यावे लागेल.
पुरेशा स्क्वाड्रन्स नाहीत
लढाऊ विमानांच्या ४२ स्क्वाड्रन्स किंवा तुकड्या या भारतासाठी, चीन व पाकिस्तान या दोन शत्रूंशी लढण्यास पर्याप्त आहेत याविषयी अनेकदा लिहून आले. मिग-२१ विमानांच्या निवृत्तीनंतर हवाईदलाच्या स्क्वाड्रन्सची संख्या २७ इतकी झाली असून, गेल्या सहा दशकांतील ती नीचांकी ठरते. ही पोकळी कशी भरायची याविषयी अत्युच्च पातळीवर गोंधळाची स्थिती आहे. राफेलच्या अधिग्रहणातून ते साधण्यासारखे नाही. सुमारे ११४ राफेल विमाने दाखल होण्याची प्रक्रियाही रखडलेली आहे. दरनम्यानच्या काळात, भारताच्या पहिल्यावहिल्या पाचव्या पिढीतील (फिफ्थ जनरेशन) लढाऊ विमानाच्या निर्मितीची महत्त्वाकांक्षा आपण बाळगून आहोत. त्यासाठी सरकारने १५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तेजस एमके टू नामक हे विमान पुढील दशकाच्या सुरुवातीपर्यंत तरी हवाईदलात दाखल होण्याची शक्यता नाही.
निव्वळ डेडलाइन्स…
हवाईदलात एचएएलकडून २०२९पर्यंत ८३ तेजस एमके वन ए विमाने दाखल होणे नियोजित आहे. गेल्या महिन्यात झालेल्या करारानुसार, आणखी ९७ विमाने २०२७ ते २०३४ या काळात हवाईदलाची ताकद वाढवतील असे अपेक्षित आहे. विद्यमान समस्येचे एक प्रमुख कारण म्हणजे, या विमानांचा आत्मा असलेल्या जीई एफ-४०४ इंजिन पुरवठ्यात अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिक (जीई) कंपनीकडून होत असलेला विलंब. पुरवठा साखळीतील अडथळ्यांमुळे हा विलंब होत असल्याचे जीईचे म्हणणे आहे. आतार्यंत केवळ चारच इंजिने दाखल झाली आहेत. एकूण ९९ इंजिने भारताला मिळणार होती. दर महिन्याला दोन इंजिने पुरवण्याचा वायदाही जीईला पाळता आलेला नाही. भारताच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अतिमहत्त्वाच्या प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यात आपल्याला अशा प्रकारे कोणावर तरी अवलंबून राहावे लागते, ही बाब विलक्षण नामुष्कीजनक ठरते.
वर्षभरात दोन अपघात
मिग-२१च्या उल्लेख फ्लाइंग कॉफिन्स असा व्हायचा, कारण या विमानाला नवीन सहस्रकात सातत्याने अपघात होत होते. तेजस अजून पुरेशा क्षमतेने हवाईदलात दाखलच झालेले नाही. तशात वर्षभरात या विमानाला दोन अपघात झालेले आहेत. गतवर्षी जैसलमेर येथे झालेल्या अपघातात वैमानिक बचावला होता. पण दुबईतील अपघातात वैमाानिकाचा जीव गेल्यामुळे या चर्चेने गंभीर वळण घेतले आहे. विशेषतः या प्रदर्शनात तेजसला भारतीय तंत्रक्षमतेचे प्रतीक म्हणून सादर केले जात होते. त्यामुळे ही दुर्घटना अधिकच खंतावणारी ठरते.
siddharth.khandekar@expressindia.com
