चीन आणि पाकिस्तानने एकाच वेळी आगळीक केल्यास त्याचा सामना करण्यासाठी, दोन्ही बाजुंवर एकाच वेळी लढण्यासाठी भारतीय वायुदल पुर्णपणे सक्षम असल्याची ग्वाही वायुदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी दिली आहे. चीन सीमेवर सैन्य दलाच्या सोईसुविधेत जरी वाढ करत असला तरी त्याचा वायुदलाच्या सज्जतेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं वायुदल प्रमुखांनी स्पष्ट केलं आहे. 

८ ऑक्टोबर या भारतीय वायुदलाच्या स्थापना दिलाच्या पुर्वसंध्येला नवनियुक्त वायुदल प्रमुख एअर चिफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी पत्रकार परिषदच्या माध्यमातून पत्रकारांशी संवाद साधला. लाईन ऑफ अक्च्युअल कंट्रोल (LAC) या चीनच्या सीमेवरील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी वायुदल सज्ज असल्याचे चौधरी यांनी सांगतिलं.

तिन्ही दलांमधील समन्वय कसा वाढेल याकडे लक्ष दिले जात आहे, यामुळे प्रत्यक्ष युद्धप्रसंगी चांगला परिणाम दिसून येईल. राफेल लढाऊ विमाने आणि अपाची या लढाऊ हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे, नव्या शस्त्र प्रणालींमुळे भारतीय वायुदलाच्या मारक क्षमतेत मोठी वाढ झाली असल्याची माहिती वायुदल प्रमुखांनी दिली.

वायुदलातील मिग-२१ लढाऊ विमाने ही पुढील ३-४ वर्षात निवृत्त केली जाणार आहेत. निवृत्त होणारी लढाऊ विमाने आणि दाखल होणारी विमाने यांचे प्रमाण लक्षात घेता पुढील दशकात लढाऊ विमानांच्या स्कॉड्रनची संख्या ही ३५ होईल असा दावा वायुदल प्रमुखांनी केला.