Indian Air Force’s Flight Lieutenant Purvesh Duragkar: भारतीय हवाई दलाच्या सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा गुरुवारी आसाममध्ये अपघात झाला. या अपघातात स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. पूर्वेश दुरगकर हे मूळचे नागपूर महाराष्ट्रातील होते. गेल्यावर्षी भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. दहा दिवसांपूर्वीच पूर्वेश दुरगकर कुटुंबियांना भेटून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग

फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर यांनी पाकिस्तानविरुद्ध राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभाग घेतला होता. महत्वाची बाब म्हणजे पूर्वेश ऑपरेशनचा हिस्सा होता याची कल्पना कुटुंबियांना देखील नव्हती. १५ दिवसांनी ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर कुटुंबीयांना तो याचा हिस्सा असल्याची माहिती देण्यात आली. “ऑपरेशनदरम्यान त्याच्याकडे फोन नव्हता त्यामुळे संपर्क करता आला नाही. १५ दिवसांनी आम्हाला याची कल्पना देण्यात आली”, असे पूर्वेशच्या कुटुंबियांनी पीटीआय वृत्तसंस्थेला सांगितले.

सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा अपघात

स्क्वाड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर सुखोई-३० एमकेआय लढाऊ विमानाचा सराव करत असताना विमान बेपत्ता झाले. जोरहट विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर विमानाचा रडारशी संपर्क तुटला. विमानतळापासून ६० किलोमीटरच्या अंतरावर विमानाचा अपघात झाला व त्यात दोघांचाही मृत्यू झाला. उड्डाणानंतर ७.४२ वाजता त्याचा संपर्क तुटला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

मुलाबद्दल माहिती देताना वडील भावूक

पूर्वेश यांचे वडील मुलाबाबत बोलताना भावूक झाले. “पूर्वेश भारतीय हवाई दलाचा भाग होता याचा त्याला खूप अभिमान होता. लढाऊ विमान उडवणे त्याला खूप अभिमानाचे वाटायचे. आसाममधील तेजपूरमध्ये त्याचे मूळ पोस्टींग होते पण तिथं धावपट्टीचे काम सुरु असल्याने तो जोरहट येथून काम करत होता. देशासाठी त्याने सर्वोच्च बलिदान दिले आहे, युवकांनी त्याच्याकडून प्रेरणा घ्यावी”, असे त्यांचे वडील पीटीआयशी बोलताना म्हणाले. 

नागपूरमध्येच शिक्षण

पूर्वेश दहा दिवसांपूर्वीच कुटुंबियांना भेटण्यासाठी नागपूरला आले होते. त्यांचे सर्व शिक्षण नागपूरमधून झाले होते. २८ वर्षीय पूर्वेश यांचे लग्न नव्हते झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात आई-वडील, बहीण असा परिवार आहे

पहलगाम येथील दहशतवादी हल्ला

२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून भारताने ०७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्धवस्त केले होते. भारताने लष्कर – ए- तैयबाचे तळ उद्धवस्त केले होते, यात १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. पाकिस्तानकडून देखील या प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला पण, भारताने हे हल्ले यशस्वीपणे परतावून लावले. यानंतर १० मे रोजी पाकिस्तानकडून सीझफायर करण्याची विनंती करण्यात आली.