Indian American Candidates US Midterm Elections 2026 : अमेरिकेतील मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीय वंशाच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या दोन उमेदवारांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांनी आपापल्या जागांवर पुन्हा विजय मिळवत दुसऱ्यांदा पदावर विराजमान होण्याचा मार्ग मोकळा केला आहे. एनबीसी न्यूजने वर्तवलेल्या अंदाजानुसार या दोघांनीही निवडणुकीत बाजी मारली आहे. दरम्यान, फ्लोरिडामधील प्रतिनिधीगृहाच्या एका चुरशीच्या लढतीत भारतीय वंशाच्या आणखी एक डेमोक्रॅटिक उमेदवार पिया दांडिया आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षाचे भारतीय वंशाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांना ओहायोच्या राज्यपाल पदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमी अॅक्टन यांनी त्यांचा पराभव केल्याचं असोसिएटेड प्रेस (एपी) आणि एनबीसी न्यूजने जाहीर केलेल्या अंदाजात म्हटलं आहे. अमेरिकेत मंगळवारी मध्यावधी निवडणुकांसाठी मतदान झालं. अद्याप अनेक मतदारसंघांतील निकाल जाहीर होणं बाकी आहे.
सुहास सुब्रमण्यम दुसऱ्यांदा व्हर्जिनियातून विजयी
एनबीसी न्यूजच्या अंदाजानुसार, सुहास सुब्रमण्यम यांनी व्हर्जिनियाच्या दहाव्या काँग्रेस मतदारसंघातून विजय मिळवला आहे. सुब्रमण्यम यांनी जवळपास ६०.६७ टक्के मते मिळवून त्यांचे रिपब्लिकन प्रतिस्पर्धी डेव्ह बेकविथ यांचा पराभव केला आहे. या मतदारसंघात स्वतंत्र उमेदवार अहसेन मलिक हे देखील निवडणुकीच्या रिंगणात होते. सुब्रमण्यम यांनी २०२५ मध्ये पहिल्यांदा पदभार स्वीकारला होता. आता त्यांना दुसऱ्यांदा दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. २०२४ मध्ये ते व्हर्जिनियातून अमेरिकन काँग्रेसवर निवडून जाणारे पहिले भारतीय-अमेरिकन ठरले होते.
अरुणा मिलर यांची मेरीलँडमध्ये पुन्हा बाजी
भारतीय वंशाच्या अरुणा मिलर यांनी मेरीलँडच्या उपराज्यपालपदावर पुन्हा विजय मिळवला आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे गव्हर्नर वेस मूर यांनीही पुन्हा निवडणूक जिंकल्याचा अंदाज एनबीसी न्यूजने वर्तवला आहे. मिलर यांनी मूर यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. या जोडीने रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रॉब क्रॉप आणि त्यांचे सहकारी डॅन कॉक्स यांचा पराभव केला. या विजयामुळे अमेरिकेतील एका महत्त्वाच्या राज्याच्या वरिष्ठ कार्यकारी पदावर भारतीय वंशाच्या व्यक्तीचे स्थान कायम राहिलं आहे.
फ्लोरिडात पिया दांडिया विजयी
फ्लोरिडाच्या २२ व्या काँग्रेस मतदारसंघात डेमोक्रॅटिक पक्षाच्या पिया दांडिया आणि रिपब्लिकन पक्षाचे केसी अस्कर यांच्यात चुरशीची लढत झाली. फ्लोरिडा यांच्या एक्स खात्यावरील माहितीनुसार त्यांचा विजय झाला आहे.
विवेक रामास्वामी यांचा ओहायोमध्ये पराभव
ओहायोच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाच्या एमी अॅक्टन यांनी रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार विवेक रामास्वामी यांचा पराभव केला. एपी आणि एनबीसी न्यूजने अॅक्टन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. एनबीसीच्या आकडेवारीनुसार, अॅक्टन यांना ५०.९ टक्के, तर रामास्वामी यांना ४५.८ टक्के मते मिळाली आहेत. गेल्या २० वर्षांत ओहायोमध्ये गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकणाऱ्या अॅक्टन या पहिल्या डेमोक्रॅटिक उमेदवार ठरल्या आहेत. तसेच ओहायोच्या इतिहासात गव्हर्नरपदी निवडून येणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत.
