अमेरिकेतील ऑस्टिन, टेक्सास येथे एका गर्दीने भरलेल्या बारमध्ये झालेल्या भीषण गोळीबाराच्या घटनेत आता नवीन माहिती समोर आली आहे. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून यामध्ये एका २१ वर्षीय भारतीय अमेरिकन विद्यार्थिनीचाही समावेश आहे. सविता शान असे या तरुणीचे नाव आहे.

या गोळीबाराच्या कारणांचा अद्याप पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र हल्लेखोराचे संभाव्य इराण कनेक्शन समोर आले आहे. गोळीबार करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटली आहे. या घटनेतील हल्लेखोराचे नाव Ndiaga Diagne असे असून त्याचे वय ५३ वर्षे आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या हल्लेखोराने गोळीबार केला तेव्हा त्याने इराणच्या झेंड्याचे डिझाइन असलेले कपडे परिधान केले होते. याबरोबरच कपड्यांवर ‘प्रॉपर्टी ऑफ अल्लाह’ असेही लिहिलेले होते. कायदा अंमलबजावणी अधिकार्‍यांच्या हवाल्याने एपी या वृत्तसंस्थेने यासंबंधी वृत्त दिले आहे.

या गोळीबाराच्या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या तीन जणांपैकी सविता शान ही एक होती, तर इतर दोघे १९ वर्षीय रायडर हॅरिंग्टन आणि ३० वर्षीय जॉर्ज पेडरसन हे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा तेथे जमलेल्या गर्दीमध्ये विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. हल्लेखोराने रायफलने गोळीबार सुरू केल्यानंतर विद्यार्थी स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळू लागले. नंतर हल्लेखोर पोलिसांने केलेल्या कारवाईत ठार झाला.

मात्र, या गोळीबारामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नाही. एफबीआय आणि ऑस्टिन पोलिसांचे म्हणणे आहे की गोळीबाराच्या हेतूबद्दल निश्चित काहीही सांगणे अद्याप खूप घाईचे ठरेल.

सविता शान कोण आहे?

गोळीबारात प्राण गमावलेल्यांमध्ये एक २१ वर्षीय भारतीय-अमेरिकन विद्यार्थिनी सविता शान ही एक होती, ती टेक्सास विद्यापीठात मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टम्स आणि अर्थशास्त्र या विषयात शिक्षण घेत होती. मॅककॉम्ब्स स्कूल ऑफ बिझनेसमधील तिच्या एका प्राध्यापकांनी सांगितले की ती एक ‘सुपरस्टार स्टुडंट’ होती, तसेच ती या वर्षी मे महिन्यात आपली पदवी पूर्ण करणार होती.

तर दुसरीकडे हल्लेखोर हा मूळचा सेनेगल येथील होता आणि तो २००० साली B-2 टुरिस्ट व्हिसावर अमेरिकेत आला होता. एपीने दिलेल्या वृत्तानुसार, एका अमेरिकन महिलेशी लग्न केल्यानंतर सहा वर्षांनी तो कायदेशीर कायमस्वरूपी र