पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेमध्ये दाखल झाले आहेत. पंतप्रधान मोदी यांनी एअर इंडिया वन या विशेष विमानाने भारतातून अमेरिकेच्या दिशेने उड्डाण केलं होतं. भारतीय वेळेनुसार आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास मोदी अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. येथील जॉइण्ट बेस अँण्ड्रूस विमानतळावर भारतीयांनी मोदींचं मोठ्या उत्साहामध्ये स्वागत केलं. मोदींनीच यासंदर्भातील काही फोटो सोशल नेटवर्किंगवरुन शेअर केलेत.
नक्की पाहा हे फोटो >> अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं जंगी स्वागत; पाहा खास फोटो
पंतप्रधान मोदी जेव्हा वॉशिंग्टनमध्ये पोहचले तेव्हा हलक्या स्वरुपाचा पाऊस पडत होता. मात्र तरीही मोदींचं स्वागत करण्यासाठी शेकडोच्या संख्येने भारतीय विमानतळाबाहेर उभे होते. मोदी… मोदी… अशा घोषणा देणाऱ्या या भारतीयांच्या हाती भारतीय ध्वजही दिसत होता. करोना प्रादुर्भावानंतर शेजारच्या बांगलादेशचा दौरा वगळल्यास मोदींचा हा पहिलाच मोठा दौरा आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी मोदींचं स्वागत केलं. भारताचे अमेरिकेतील दूत तरनजीत सिंग संधू हे सुद्धा मोदींच्या स्वागतासाठी या ठिकाणी आले होते. मोदींनी विमानतळाबाहेर जमलेल्या समर्थकांशी हस्तांदोलन करुन स्वागत स्वीकारले.
आम्हाला मोदींना पाहून फार आनंद झाला आहे. मोदींना पाहण्यासाठी आम्हाला पावसात उभं रहावं लागलं तरी हरकत नाही, असं या ठिकाणी आलेल्या एका व्यक्तीने एएनआयशी बोलताना सांगितलं. तसेच या ठिकाणी जमलेल्यांपैकी एका भारतीय महिलेने पंतप्रधान मोदींचा हा दौरा भारत आणि अमेरिकेमधील संबंध दृढ करण्यासाठी फायद्याचा ठरेल असं मत व्यक्त केलं आहे.
“करोना आणि अफगाणिस्तान समस्येच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्वाचा आहे. मोदी हे जगातील असे नेते आहेत जे कोणतीही समस्या सोडवू शकतात. आम्ही भारतीय आहोत आणि ते कोट्यावधी भारतीयांचं प्रतिनिधित्व करत आहेत,” असं ही महिला म्हणाली.
अमेरिका भेटीत आपण भारत आणि अमेरिका यांच्यातील धोरणात्मक भागीदारीवर आधारित संबंध अधिक दृढ करणार असून जपान व ऑस्ट्रेलिया यांच्याबरोबरचे संबंधही मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी अमेरिका दौऱ्यावर रवाना होताना सांगितले.
आमसभेच्या अधिवेशनास उपस्थित राहण्यासाठी ते अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी त्यांनी सांगितले की, संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत करोना महासाथ, दहशतवाद, हवामान बदल व इतर महत्त्वाचे मुद्दे आपण मांडणार आहोत. बुधवारी सकाळी पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना झाले त्यानंतर त्यांनी ट्वीट संदेशात विमानात बसतानाचे छायाचित्र टाकले आहे.
२२ ते २५ सप्टेंबर या काळात आपण अध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला जात आहोत. या भेटीत भारत व अमेरिका यांच्यातील संयुक्त व सर्वंकष भागीदारी अधिक दृढ केली जाईल. प्रादेशिक व जागतिक पातळीवरील मुद्द्यांवर बायडेन यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असं मोदींनी सांगितलं आहे.
मोदी यांनी सांगितले की, ते क्वाड देशांच्या बैठकीस उपस्थित राहणार असून त्यावेळी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन, जपानचे पंतप्रधान योशिहिडे सुगा व अमेरिकी अध्यक्ष जो बायडेनही सहभागी होणार आहेत. क्वाड देशांची आभासी बैठक मार्च महिन्यात झाली होती पण आता प्रत्यक्ष या नेत्यांना भेटण्याची संधी मिळत आहे. मार्चमधील बैठकीच्या फलश्रुतीचा आढावा यावेळी घेण्यात येईल. हिंद-प्रशांत क्षेत्रातील परिस्थितीवरही चर्चा होईल. आपल्या अमेरिका भेटीतून त्या देशाबरोबरच्या धोरणात्मक भागीदारीला बळ मिळणार असून जपान व ऑस्ट्रेलियासारख्या देशांशी असलेले संबंधही मजबूत होणार आहेत.
दरम्यान बायडेन यांनी आयोजित केलेल्या कोविड १९ शिखर बैठकीस मोदी उपस्थित राहणार असल्याचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी म्हटले असून अफगाणिस्तानचा मुद्दा हा मोदी व बायडेन यांच्या द्विपक्षीय चर्चेत महत्त्वाचा असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
२४ सप्टेंबरला सायंकाळी मोदी हे आमसभेच्या अधिवेशनासाठी न्यूयॉर्कला रवाना होणार आहेत. पंतप्रधान मोदी हे अमेरिकेतील मोठ्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनाही भेटणार आहेत.