Indian Army drone testing facility : भारतीय लष्कर लवकरच देशभरात सहा ‘आश्वस्त’ प्रयोगशाळा सुरू करणार आहे. या प्रयोगशाळांमध्ये लष्कराकडून वापरल्या जाणाऱ्या सर्व ड्रोनची आणि लष्करासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही अनिवार्य तपासणी केली जाणार आहे. ड्रोनच्या हार्डवेअरसोबतच त्यातील सॉफ्टवेअर आणि फर्मवेअरमध्ये लपलेल्या सुरक्षाविषयक त्रुटी शोधून त्या दूर करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

‘आश्वस्त’ (AASHVAST) म्हणजे काय?

‘आश्वस्त’ (AASHVAST – Assessment and Analysis of Electronic Systems Hardware for Vulnerabilities and Security Threats) ही इलेक्ट्रॉनिक प्रणालींच्या हार्डवेअरमधील त्रुटी आणि सुरक्षा धोक्यांचे मूल्यांकन व विश्लेषण करणारी यंत्रणा आहे. सध्या दिल्लीमध्ये या प्रयोगशाळांपैकी एका सुविधेचे उद्घाटन झाले आहे. येत्या काही महिन्यांत आणखी किमान पाच प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. या प्रयोगशाळांमध्ये केवळ ड्रोनचे हार्डवेअर तपासले जाणार नाही, तर ड्रोन चालवणारे सॉफ्टवेअर आणि फर्मवेअरही तपासले जाईल. उत्पादनाच्या वेळी किंवा सॉफ्टवेअर अपडेट करताना फर्मवेअरमध्ये छुप्या कोड, कमांड किंवा इतर त्रुटी राहिल्या आहेत का, याचा शोध घेतला जाणार आहे.

एप्रिलमध्ये, लष्कराने ड्रोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक घटकांमधील फर्मवेअर आणि एम्बेडेड प्रणालींच्या प्रमाणीकरणासाठी अचूक सॉफ्टवेअर खरेदी करण्याकरिता प्रस्तावासाठी विनंती देखील जारी केली होती.

ड्रोनला ठरावीक ठिकाणी पोहोचण्यापासून रोखणारे ‘बग्स’

‘आश्वस्त’ प्रणाली सुमारे १४ प्रकारच्या सुरक्षाविषयक त्रुटी शोधू शकते. यामध्ये एखाद्या विशिष्ट भौगोलिक भागात ड्रोनच्या कार्यात बिघाड होणे, पूर्वनियोजित ठिकाणी ड्रोन न पोहोचणे, तसेच ड्रोन लक्ष्य गाठण्यापूर्वीच बंद पडणे यासारख्या समस्या येतात.

काही वेळांवर किंवा विशिष्ट ठिकाणांवर आधारित असणाऱ्या त्रुटींमुळे ड्रोनची कार्यक्षमता खालावू शकते. जरी ड्रोन सामान्य परिस्थितीत सुरळीत काम करत असला, तरी ठरावीक कालावधीत किंवा विशिष्ट भौगोलिक क्षेत्रांत त्याच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो. फर्मवेअरमध्ये लपवून ठेवलेल्या कमांड्स किंवा सध्या वापरात नसलेले जुने कोडही अशा त्रुटींचे कारण ठरू शकतात. यामुळे संघर्षग्रस्त भागात ऑपरेशनदरम्यान ड्रोनने अचानक काम करणे थांबवण्याचा किंवा त्याचे निर्धारित मिशन पूर्ण न करण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न आहे.

चिनी घटकांवर विशेष लक्ष

लष्करी ड्रोनमध्ये चिनी बनावटीच्या इलेक्ट्रॉनिक घटकांचा वापर हा भारतासाठी सुरक्षेच्या दृष्टीने चिंतेचा विषय आहे. विशेषतः पूर्वेकडील सीमांवरील मोहिमांमध्ये ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यातील संभाव्य माहिती आणि सायबर सुरक्षा जोखमी महत्त्वाच्या आहेत. भारताने यापूर्वी देशांतर्गत लष्करी ड्रोन उत्पादकांना चिनी बनावटीचे घटक वापरण्यास मनाई केली आहे. २०२५ मध्ये आर्मी डिझाईन ब्युरोने ड्रोनमधून मूळ चिनी घटक काढून टाकण्यासाठी संरक्षण मंत्रालयाला सविस्तर आराखडा सादर केला होता.

छुप्या पासवर्डपासून रिमोट ॲक्सेस टूल्सपर्यंत तपासणी

प्रकल्पाशी संबंधित व्यक्तींनुसार, ‘आश्वस्त’ प्रयोगशाळांमध्ये ड्रोनमधील चिनी किंवा इतर परदेशी बनावटीचे सक्रिय घटक, छुप्या पासवर्ड, दूरवरून उपकरण नियंत्रित करण्याची साधने आणि स्थान-आधारित सुरक्षा नियंत्रण यांचीही तपासणी केली जाणार आहे. यामागचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे परदेशी घटक केवळ भारतात किंवा अन्य देशात खरेदी केले असल्याच्या बिलावरून ‘मेड इन इंडिया’ किंवा अन्य देशाचे उत्पादन म्हणून दाखवले जाण्याची शक्यता तपासणे.

प्रकल्पाशी संबंधित एका व्यक्तीने सांगितले की, एखादा इलेक्ट्रॉनिक घटक कुठून खरेदी केला याची माहिती इनव्हॉइसवर मिळते. मात्र चिपच्या आत नेमके कोणते घटक किंवा कोड एम्बेड केले आहेत, हे केवळ बिलावरून समजू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष तांत्रिक तपासणी महत्त्वाचे ठरणार आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही तपासणी

सुरुवातीला ‘आश्वस्त’ लष्करी ड्रोनवर मुख्यत्वे स्वरूपात लक्ष असेल. मात्र भविष्यात लष्कराकडून खरेदी होणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चिनी मालकीचे तंत्रज्ञान किंवा तत्सम परदेशी तंत्रज्ञान लपवलेले आहे का, याचीही तपासणी केली जाऊ शकते.

लष्कराच्या मते, ‘आश्वस्त’ सुविधेमुळे महत्त्वाच्या संरक्षण प्रणालींची सायबर लवचिकता वाढवण्यास आणि कार्यान्वित सज्जता मजबूत करण्यास मदत होईल. तसेच, ही सुविधा ‘आत्मनिर्भर भारत’च्या उद्दिष्टांशीही जोडलेली आहे.