नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय सैन्याने अत्यंत अचूकतेने, प्रभावी प्रतिहल्ला केला.
राजौरी सेक्टरमधीलर पाकिस्तानी सैन्य चौक्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतीय लष्करातील सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी मागच्या काही वर्षात भारतीय लष्कराने विविध भागातील पाकिस्तानी सैन्य चौक्यांना लक्ष्य केले आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन करताना पाकिस्तानकडून भारताच्या नागरीवस्त्यांना लक्ष्य करण्यात येते.
पाकिस्तानच्या गोळीबारात जवान शहीद
जम्मू-काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याात बुधवारी नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानकडून गोळीबारासह मोठया प्रमाणावर तोफगोळयांचा मारा करण्यात आला. यामध्ये एक जवान शहीद झाला असून एक नागरिक जखमी झाला. मांजाकोटी, केरी, बालाकोट आणि कारोल या भागांमध्ये बुधवारी रात्री १० ते ११ या वेळेत पाकिस्तानी सैन्याने गोळीबारासह तोफगोळयांचा मारा केला होता.
पाकिस्तानने केलेल्या तोफगोळयांच्या माऱ्यामध्ये राजधानी गावातील नयामतुल्ला (३५) हा नागरिक जखमी झाला. “या नागरिकाला तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्याच्या प्रकृतीला कुठलाही धोका नाही” असे राजौरी जिल्हायेच पोलीस अधीक्षक चंदन कोहली यांनी सांगितले.
