General Upendra Dwivedi Army Chief Warns Pakistan: भारतामध्ये दहशतवाद पसरवणाऱ्या आणि दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी थेट इशारा दिला आहे. “जर पाकिस्तानने भारतात दहशतवादी कारवाया थांबवल्या नाहीत, तर त्यांना ‘भूगोलाचा भाग राहायचंय की इतिहासाचा’, हे स्वतःच ठरवावं लागेल,” अशा अत्यंत कडक शब्दांत लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला सुनावले आहे.
दिल्लीतील मानेकशॉ सेंटरमध्ये ‘युनिफॉर्म अनव्हेल्ड’ द्वारे आयोजित एका संवादसत्रात, गेल्या वर्षी ‘ऑपरेशन सिंदूर’ला कारणीभूत ठरलेली परिस्थिती पुन्हा निर्माण झाल्यास भारतीय लष्कर कसे प्रत्युत्तर देईल, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर लष्करप्रमुख म्हणाले, “तुम्ही माझे पूर्वीचे म्हणणे ऐकले असेलच… की पाकिस्तानने दहशतवाद्यांना आश्रय देणे आणि भारताच्या विरोधात कारवाया करणे सुरूच ठेवले, तर त्यांना भूगोलाचा भाग व्हायचे आहे की इतिहासाचा, हे ठरवावे लागेल.”
‘भूगोल की इतिहास? स्वतःच निर्णय घ्या’
पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादावर बोलताना लष्करप्रमुख म्हणाले, “पाकिस्तानने जर दहशतवाद्यांना पाठिंबा देणे आणि भारताविरोधात कारवाया करणे सुरूच ठेवले, तर त्यांना स्वतःलाच एक निर्णय घ्यावा लागेल. त्यांना जगाच्या नकाशावर (भूगोल) अस्तित्व टिकवून ठेवायचे आहे की केवळ इतिहासाच्या पानात जमा व्हायचे आहे, हे त्यांनीच ठरवावे.”
लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य अत्यंत गंभीर मानले जात आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यातही त्यांनी अशाच प्रकारचा इशारा दिला होता. “जर इस्लामाबादने भारतात दहशतवाद पसरवणे थांबवले नाही, तर ‘ऑपरेशन सिंदूर ‘ दरम्यान भारताने दाखवलेला संयम यापुढे पाहायला मिळणार नाही. भारताचे प्रत्युत्तर इतके भीषण असेल की पाकिस्तानला आपल्या अस्तित्वाची काळजी करावी लागेल,” असे जनरल द्विवेदी यांनी आधीच स्पष्ट केले आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचाही पाकिस्तानला इशारा
लष्करप्रमुखांचे हे वक्तव्य संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर आले आहे. गुजरात आणि पाकिस्तानच्या सिंध प्रांताच्या सीमेवर असलेल्या ‘सर क्रीक’ या दलदलीच्या भागात पाकिस्तानकडून लष्करी पायाभूत सुविधा वाढवल्या जात आहेत. यावर संरक्षणमंत्र्यांनी तीव्र आक्षेप घेतला होता. अनेक वर्षांच्या चर्चेनंतरही पाकिस्तान सीमावाद जिवंत ठेवत असून त्यांचे इरादे संशयास्पद आहेत, असा आरोप राजनाथ सिंह यांनी केला होता. तसेच, सर क्रीक भागात पाकिस्तानने कोणतीही आगळीक करण्याचा प्रयत्न केल्यास भारत त्याला चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला होता. सध्या भारतीय लष्कर आणि सीमा सुरक्षा बल (BSF) या भागात अत्यंत सतर्क आहे.
काय होते ‘ऑपरेशन सिंदूर’?
गेल्या वर्षी २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे एक मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केले. या कारवाईत भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील (PoJK) दहशतवाद्यांच्या ९ तळांना अचूक लक्ष्य करून ते उद्ध्वस्त केले होते. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात पाकिस्तानच्या कोणत्याही लष्करी तळाला लक्ष्य करण्यात आले नव्हते. केवळ दहशतवादी पायाभूत सुविधा मोडून काढण्यात आल्या होत्या. कारवाईनंतर दोन्ही देशांमधील तणाव कमालीचा वाढला होता, मात्र १० मे २०२५ रोजी झालेल्या युद्धविरामानंतर हा संघर्ष शांत झाला.
लष्करप्रमुखांच्या या ताज्या विधानामुळे भारताने आता पाकिस्तानला स्पष्ट संकेत दिले आहेत की, यापुढे पाकिस्तानच्या कोणत्याही चिथावणीखोर कृत्याला भारत सहन करणार नाही आणि गरज पडल्यास ‘ऑपरेशन सिंदूर’पेक्षाही मोठी लष्करी कारवाई केली जाईल.
