scorecardresearch

भारतीय लष्कराकडून ‘लष्कर ए तोयबा’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा; राजौरी सेक्टरमध्ये चकमक सुरु

याच ठिकाणी मागील काही आठवड्यांपासून सुरु असणाऱ्या चकमकींमध्ये ९ भारतीय जवान शहीद झाले असल्याने ही कारवाई भारतासाठीचं मोठं यश मानलं जातंय

Indian Army
अजूनही काही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी चकमक सुरु आहे. (फाइल फोटो सौजन्य रॉयटर्सवरुन साभार)

भारतीय लष्कराने पाकिस्तानमधील ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्थान घातलं आहे. राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलांमध्ये भारतीय लष्कराने ही कारवाई केली. भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात दडून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरु आहे.

राजौरी सेक्टमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणाऱ्या भारतीय लष्करातील कमांडर्सची सध्या सुरु असणाऱ्या कारवाईबद्दल चर्चा केली होती. यावेळी या कमांडर्सला स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. दहशतवादी स्वत:च बाहेर येऊन हल्ल्याचा प्रयत्न करतील तेव्हा उत्तर द्यावे असा सल्ला स्थानिक कमांडर्सला देण्यात आल्याचं हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

“हे दहशतवादी जंगलामधून दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्याने भारतीय लष्कराचे जवान शहीद झाले. दोन दोनच्या गटाने हल्ला केल्याने त्यांना भारतीय लष्कराचे लक्ष्य विचलित करण्याची आणि नंतर वेगाने हलचाल करण्याची संधी मिळते,” असं एका भारतीय कमांडरने सांगितलं.

मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये राजौरी आणि पूंछ जिल्ह्यांच्या सीमांवर असणाऱ्या जंगलामधून श्रीनगरमध्ये ‘लष्कर ए तोयबा’च्या ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केल्याची माहिती दिल्लीमधील साऊथ ब्लॉकने दिलीय. यापैकी अनेकांचा मुख्य नियंत्रण रेषेजवळच खात्मा करण्यात आला. अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर पाकिस्तानी दहशतवादी कारवायांना जोर आलाय. विशेष म्हणजे अशी परिस्थिती निर्माण होईल आणि अफगाणिस्तानमधील घडामोडींनंतर भारतामधील दहशतवादी घुसखोरी वाढण्याची शक्यात आधीपासूनच असल्याने या भागांमध्ये भारताने सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेतलीय.

भारतीय लष्कर सध्या स्वत:हून हल्ला करण्याऐवजी दहशतवादी लपून बसलेल्या ठिकाणाला घेराव घालून समोरुन एखादी हलचाल होण्याची वाट पाहतात. जंगलामध्ये युद्ध करताना धीर धरणं आणि विचारपूर्वक पद्धतीने हल्ला करणं फार महत्वाचं असतं. असं केलं तर कमी प्रमाणात जिवीतहानी होते आणि दहशतवाद्यांचा खात्मा करणं अधिक सोयिस्कर होतं असं एका कमांडरने सांगितल.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-10-2021 at 15:59 IST
ताज्या बातम्या