भारतीय लष्कराच्या जवानांनी तब्बल १८ हजार ६०० फूट उंचीवर एक धाडसी बचाव मोहीम राबवली आहे. एका जखमी व्यक्तीला लष्कराच्या जवानांनी हेलिकॉप्टरने एअर लिफ्ट करत सुखरुप सुटका केली आहे. लष्कराच्या या धाडसी बचाव मोहिमेचं सर्वत्र कौतुक होत असून या मोहिमेचा थरारक व्हिडीओ आता समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
भारतीय लष्कराच्या जवानांनी लडाखच्या ‘नुन-कुन’ पर्वतावर तब्बल १८ हजार ६०० फूट उंचीवर ही धाडसी बचाव मोहीम राबवली आहे. भारतीय लष्करी दलाच्या जवानांनी अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक परिस्थितीत देखील एका जखमी व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
सैन्याकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने १८ हजार ६०० फूट उंचीवर असलेल्या रुग्णाची सुटका करण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या बचाव मोहिमेदरम्यान जोरदार वारे असूनही डोंगराच्या तीव्र उतारावरून या व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढलं आहे. ही मोहीम अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत पार पडली आहे. अंधार पडण्यापूर्वी हे बचावकार्य पूर्ण करण्यासाठी सैन्यासमोर अत्यंत कमी वेळ असतानाही ही मोहीम पूर्ण करण्यात आली आहे.
भारतीय लष्कराच्या ‘फायर अँड फ्युरी कॉर्प्स’ने ‘एक्स’वरील एका पोस्टच्या माध्यमातून या मोहिमेचं कौतुक केलं आहे. या मोहिमेला भारतीय लष्करी हवाई दलाच्या जवानांचं कौशल्य, धैर्याचं प्रदर्शन म्हटलं आहे. दिवसातील लँडिंगसाठी उपलब्ध असलेल्या शेवटच्या वेळेत हे बचावकार्य पार पडल्याचंही लष्कराने पोस्टमध्ये नमूद केलं आहे.
वृत्तानुसार, १८ हजार ६०० फूट एवढ्या उंचीवर ही बचाव मोहीम पार पाडायची असल्यामुळे वैमानिकांना उड्डाण करणं कठीण झालं होतं. कारण वातावरणाच्या घनतेमुळे इंजिनच्या कार्यक्षमतेवर आणि रोटरवर परिणाम होत होता. हेलिकॉप्टरची उचलण्याची क्षमता वाढवण्यासाठी वैमानिकांनी सर्व अनावश्यक उपकरण काढून टाकली होती. तसेच मर्यादित इंधन ठेवलं होतं. जेव्हा त्या ठिकाणी हे हेलिकॉप्टर पोहोचलं, तेव्हा वैमानिकांनी हेलिकॉप्टरला कमी उंचीवर स्थिर ठेवलं. वैमानिकांनी अपवादात्मक अचूकता, धैर्य आणि दृढनिश्चयाने ही बचाव मोहीम यशस्वी केली.
