Indian Army Major Death: जैसलमेर, राजस्थान येथे लष्करी तळाजवळ एक अपघाताची घटना समोर आली आहे. कार उंटाला धडकून झालेल्या अपघतात भारतीय लष्करातील ३० वर्षीय मेजर यांचा मृत्यू झाला असून, दोन लेफ्टनंट पदावरील अधिकारी जखमी झाले आहेत. गुरुवारी रात्री उशिरा लष्करी तळाजवळच हा अपघात झाला. हमजा आरिफ असे मृत्यू झालेल्या ३० वर्षीय मेजरांचे नाव आहे.
काही महिन्यांपूर्वीच झाला होता मृत्यू
याबाबतचे इंडिया टुडेने वृत्त प्रसिद्ध केले आहे. वृत्तातील माहितीनुसार, हमजा आरिफ असे मृत्यू मेजरांचे नाव आहे. हमजा मध्य प्रदेशातील इंदूरचे रहिवासी होते. काही महिन्यांपूर्वीच त्यांचा विवाह झाला होता. आरिफचे स्वत: कार चालवत होते. शहरातून लष्करी तळाकडे माघारी येत असताना कार उंटाला धडकून हा अपघात झाला. पोलिसांनी इंडिया टुडेला दिलेल्या माहितीनुसार, उंट अचानक रस्त्यात आल्याने वाहन चालकाला ब्रेक दाबण्यासाठी किंवा वाहन वळविण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि हा अपघात झाला.
पाचवेळी पलटी झाली कार
उंटाला धडकल्यानंतर कार पाचवेळी पलटी झाली तर जवळपास १०० मीटर लांब घसरत गेली. यात चालक हमजा आरिफ यांचा मृत्यू झाला तसेच, उंटाचा देखील जागीच मृत्यू झाला. याशिवाय या अपघातात दोन लेफ्टनंट पदावरील अधिकारी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच लष्करी तळावरील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. जखमी अधिकाऱ्यांवर लष्कराच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हमजा आरिफ यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
दोन लेफ्टनंट अधिकारी जखमी
अभिनव राठोड आणि आयुष्यमान गुसैन असे या अपघातात जखमी झालेल्या लेफ्टनंट अधिकाऱ्यांची नावे आहेत. अधिकाऱ्यांची तब्येत आता कशी आहे? याची माहिती अधिकृतपणे समोर आलेली नाही, असे इंडिया टुडेच्या वृत्तात म्हटले आहे. अपघातानंतर पोलिस देखील घटनास्थळी दाखल झाले. अपघातनंतर उंटाचा देखील मृत्यू झाला असून, वाहनाचे देखील मोठे नुकसान झाले आहे. उंटाला धडकल्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार पाचवेळी पलटलीवर अखेर भिंतीवर जाऊन आदळली.
