Indian Army DGMO Press Conference: पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा वचपा काढण्यासाठी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीर व पाकिस्तानच्या हद्दीत एअर स्ट्राईक केला. त्यापाठोपाठ पाकिस्तानी लष्करानं केलेले ड्रोन हल्ले यशस्वीरीत्या परतवून लावले. शिवाय पाकिस्तानी लष्कराच्या काही तळांवरही भारताच्या हवाई दलानं यशस्वी हल्ले चढवले. अखेर पाकिस्ताननं नमतं घेत भारतासमोर शस्त्रविरामाचा प्रस्ताव ठेवला. भारतानंही सहमती दर्शवली. पण अवघ्या काही तासांत पाकिस्ताननं पुन्हा हल्ला केला. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाचे डीजीएमओ व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी पाकिस्तानला सज्जड दम दिला आहे.

७ मेच्या मध्यरात्रीपासून १० मेच्या रात्री पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या शस्त्रविरामाच्या उल्लंघनापर्यंतच्या कारवाईची माहिती आज भारतीय लष्करानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. या पत्रकार परिषदेसाठी पहिल्यांदाच तिन्ही सैन्यदलांचे डीजीएमओ उपस्थित होते. उद्या १२ मे रोजी भारत व पाकिस्तान यांच्या डीजीएमओंमध्ये शस्त्रविरामावर होणाऱ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही पत्रकार परिषद आणि त्यात भारतीय लष्करानं स्पष्ट केलेली भूमिका महत्त्वाची होती.

आर्मीचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई दलाचे डीजीएमओ एअर मार्शल ए. के. भारती व नौदलाचे डीजीएमओ व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित होते.

पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास ‘अॅक्ट ऑफ वॉर’?

पाकिस्तानचा इतिहास पाहता शस्त्रविरामाचं उल्लंघन आणि पुन्हा आगळीक याचीही शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननं पुन्हा आगळीक केल्यास त्याला युद्धाची कृती मानता येईल का? असा प्रश्न पत्रकार परिषदेत विचारण्यात आला. त्यावर आर्मीचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी भूमिका मांडली. “गेल्या काही दिवसांपासून जे काही चाललंय, ते कोणत्याही युद्धापेक्षा कमी नाही. सामान्य परिस्थितीत दोन देशांचे हवाई दल उड्डाण घेत नाहीत. एकमेकांवर स्ट्राईक करत नाही. दररोज रात्री घुसखोरी होत नाही”, असं राजीव घई म्हणाले.

“नियंत्रण रेषेवर शस्त्रविरामावर सहमती झाली होती. पण आता तेही पाकिस्तानकडून मोडण्यात आलं आहे. आता एलओसीवर होत असलेल्या गोळीबारात घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. साधारणपणे अशावेळी दहशतवादी घुसखोरी करतात. पण आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की कदाचित हे दहशतवादी नसून पाकिस्तानी लष्कराच्या तुकड्याही असू शकतात. त्यांचा उद्देश आपल्या पोस्टवर हल्ला करण्याचा प्रयत्न असेल. या सगळ्या कृती युद्धाच्याच मानल्या जाऊ शकतात. त्यामुळे पुढे काय होईल, याचा अंदाज बांधता येणार नाही. शिवाय मला कोणताही अंदाज बांधायचा नाहीये. प्रत्येक परिस्थिती वेगळी असते. त्या प्रत्येक परिस्थितीला वेगळ्या प्रकारे तोंड दिलं जातं”, असंही त्यांनी सांगितलं.

Operation Sindoor मध्ये नौदलाची नेमकी भूमिका काय?

दरम्यान, यावेळी नौदलाचे डीजीएमओ व्हाईस अॅडमिरल ए. एन. प्रमोद यांनी परखड शब्दांत पाकिस्तानला इशारा दिला. ऑपरेशन सिंदूरमधील नौदलाची तयारी सांगताना ते म्हणाले, “मी फक्त काही गोष्टी सांगेन, बाकी तुम्ही समजून घ्या. पहिली गोष्ट म्हणजे आपलं लष्कर पाकिस्तानपेक्षा दर्जात्मकदृष्ट्या आणि संख्यात्मकदृष्ट्याही वरचढ आहे. आपण शत्रूला मोठं नुकसान पोहोचवू शकतो. समुद्री आघाडीवर आपला पूर्णपणे वरचष्मा आहे”.

“जर पाकिस्तानने हिंमत केली…”

“भारतीय नौदलाचं धोरणही इतर दोन्ही दलांप्रमाणेच ज्या प्रमाणात समोरून कारवाई होईल, त्या प्रमाणात प्रत्युत्तर देण्याच्या पद्धतीवर आधारित आहे. यावेळी जर पाकिस्तानने आणखी काही कारवाई करण्याची हिंमत केली, तर पाकिस्तानलाही माहिती आहे की आम्ही काय करू शकतो”, असा इशाराच त्यांनी दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“लष्कराचं मुख्य काम युद्ध टाळणं आणि शांतता व स्थैर्य राखणं हे असतं. पण याचा अर्थ अशा कारवायांना आपण उत्तर देत नाही असं नाही. आपण सडेतोड उत्तर दिलं आहे. कुणी कारवाई केली, तर त्याला उत्तर दिलं जाईल. दहशतवादी कारवाया झाल्या, तर आम्ही दहशतवादी तळांना लक्ष्य केलं. त्यानंतर त्यांच्या लष्करानं कारवाई करण्याचा प्रयत्न केला. त्यावर आपल्या हवाई दल व आर्मीनं त्यांच्या लष्करी ठिकाणांना लक्ष्य केलं. त्यामुळे आमचं ध्येय हे शांतता राखणं असून पाकिस्तानला हे सांगणं आहे की जर तुम्ही काही केलं, तर त्यावर सडेतोड उत्तर दिलं जाईल”, अशी परखड भूमिका ए. एन. प्रमोद यांनी मांडली.