भारतीय लष्कराच्या वेस्टर्न कमांडने पाकिस्तानला मागच्या वेळपेक्षा अधिक कठोर प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे, तसेच ‘ऑपरेशन सिंदूर २.०’ सुरू असल्याचेही भारतीय लष्करांने स्पष्ट केले आहे. जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारतीय लष्कराने गेल्या वर्षी मे महिन्यात ऑपरेशन सिंदूर मोहिम राबवली होती. या मोहिमेअंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले होते.
लेफ्टनंट जनरल राजेश पुष्कर, २ कोअरचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GOC) यांनी सांगितले की, ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानला एक कठोर संदेश पोहोचवला होता. तसेच सध्या ऑपरेशन सिंदूर २.० हे सुरू असून त्याच्या तयारीची व्याप्ती ही मागच्या वेळेपेक्षा खूप जास्त आहे. गेल्या वर्षी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख करताना पुष्कर म्हणाले की, भारताने पाकिस्तानला कठोर संदेश दिला आणि त्यावेळी अवघ्या चारच दिवसांत पाकिस्तानला गुडघे टेकायला लावण्यात आले.
“आपण पाकिस्तानला ऑपरेशनचा एक अत्यंत लहानसा नमुना दाखवला होता. अवघ्या चार दिवसांतच त्यांना गुडघे टेकायला लावले होते आणि त्यांनी आपल्या डीजीएमओंना फोन केला आणि युद्ध थांबवण्याची विनंती केली…. ते एक अत्यंत लहानसे उदाहरण होते, आणि त्याचा उद्देश हा प्रशिक्षण होता,” असे लेफ्टनंट जनरल पुष्कर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पंजाबमधील पठाणकोट येथे वेस्टर्न कमांडच्या हाय-प्रोफाइल ऑपरेशनल कॅपेबिलिटी डेमॉन्स्ट्रेशन या कार्यक्रमावेळी ते बोलत होते.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीही ऑपरेशन सिंदूर सुरूच असल्याचे म्हटले होते.
“ते (शाहबाज शरीफ) आपल्याला कोणतीही कठोर कारवाई करण्यापासून रोखू इच्छितात… ते जे करत आहेत तो एक प्रकारचा खोटारडेपणा (bluff) आहे, जो आपण उघडा पाडायला हवा. आपण त्यांच्या ‘न्यूक्लियर ब्लफ’ने विचलित होणार नाहीत,” असेही पुष्कर म्हणाले.
“ऑपरेशन सिंदूर सुरूच आहे… ऑपरेशन सिंदूर २ साठीची तयारी बऱ्यापैकी व्यापक प्रमाणावर आहे. हे ऑपरेशन कशा प्रकारे पार पडेल याबद्दल मी तुम्हाला आता सांगू शकत नाही, कारण ते आपल्याला शत्रूचे किती नुकसान करायचे आहे, यावर अवलंबून असेल. मग ते जमिनीवरचे असेल, समुद्रातील किंवा आकाशातील, आपण ते घडवून आणण्यासाठी सदैव तयार आहोत,” असेही ते पुढे बोलताना म्हणाले.
आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तयार
तर दुसरीकडे ‘वेस्टर्न कमांड’चे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज कुमार कटियार यांनी गुरुवारी लष्कर भविष्यातील कोणत्याही परिस्थितीसाठी पूर्णपणे तयार असून अण्वस्त्रांच्या धमक्यांना घाबरणार नाही असे स्पष्ट केले. भविष्यातील कोणत्याही संघर्षाचा निकाल जमिनीवर निर्णायक असेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान पाकिस्तानने एका बाजूला अण्वस्त्रांच्या धमक्या दिल्या आणि दुसरीकडे युद्धविरामासाठी केविलवाणी धडपड केल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
‘त्यांनी (पाकिस्तानने) म्हटले होते की जर आमचा विनाश झाला, तर आम्ही अर्ध्या जगाला बरोबर घेऊन जाऊ. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान आम्ही त्यांच्या अण्वस्त्रांच्या धमक्यांकडे दुर्लक्ष केले. या वेळी आम्ही पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तयार आहोत आणि आमच्याकडे भविष्यासाठी स्पष्ट योजना आहे,’ असे या वेळी लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले.
आमचे नेतृत्व देशाच्या आणि जनतेच्या भल्यासाठी वचनबद्ध आहे, तर त्यांचे नेतृत्व आणि लष्करी जनरल केवळ सत्तेत राहण्यासाठी आणि स्वत:चे महत्त्व टिकवण्यासाठी स्वार्थाने प्रेरित आहेत. याच कारणासाठी ते भारताबरोबर युद्धासारखी परिस्थिती लांबवू इच्छितात, असे लेफ्टनंट जनरल कटियार म्हणाले. पाकिस्तानकडे भारताशी समोरासमोर लढण्याचे ना धैर्य आहे ना ताकद, म्हणूनच ते छुप्या युद्धाचा अवलंब करतात, असेही ते म्हणाले.
