आता आली ‘इंडियन बोफोर्स’

प्रजासत्ताक दिनी जगाला दिसणार नव्या भारतीय तोफेचं सामर्थ्य

बोफोर्स तोफेत सुधारणा करत भारतीय तंत्रज्ञांनी बनवली 'देशी बोफोर्स' (फोटो- सीमेवर तैनात बोफोर्स तोफ)

प्रजासत्ताक दिन जवळ येतोय. भारतात खऱ्या अर्थाने लोकशाही अवतरल्याचा जल्लोष साजरा करणारा हा दिवस. नवी दिल्लीत होणाऱ्या परेड्स तसंच भारतीय सेनादलांच्या वेगवेगळ्या शस्त्रास्त्रांचं दिमाखात होणारं प्रदर्शन याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं असतं.

यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचं वैशिष्ट्य असणार आहे ती ‘देशी बोफोर्स तोफ’. १९८०च्या दशकात भारतात आयात करण्यात आलेल्या बोफोर्स तोफांपेक्षा या तोफा जास्त मारक क्षमतेच्या आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या तोफा संपूर्णपणे भारतात विकसित केल्या गेल्या आहेत. जगातल्या कोणत्याही तोफेचा मुकाबला करण्याची पूर्ण क्षमता या तोफेत आहे. या देशी बोफोर्स तोफा ३८ किलोमीटर दूरपर्यंत मारा करू शकतात. स्वीडिश बोफोर्स तोफांपेक्षा या अस्सल भारतीय बनावटींच्या तोफांची क्षमता ११ किलोमीटरने जास्त आहे. याशिवाय या तोफांमध्ये भारतीय शास्त्रज्ञ आणि तंत्रज्ञ आपलं ज्ञान वापरून आणखी सुधारणा घडवत आहेत. लवकरच भारतीय बनावटीच्या या बोफोर्स तोफा ४२ किलोमीटर दूर मारा करू शकणार आहेत.

वाचा- ‘ब्रेक्झिट’साठी ब्रिटिश पार्लमेंटची मंजुरी आवश्यक

बोफोर्स तोफा म्हणजे भारतीय राजकीय वर्तुळांमध्ये फार संवेदनशील विषय आहे. १९८० मध्ये स्वीडिश कंपनीकडून आयात करण्यात आलेल्या या तोफांच्या खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर दलाली झाल्याचा  आरोप करण्यात आले होते. यावरून काँग्रेस पक्षावर विरोधकांकडून प्रचंड टीका करण्यात आली होती. भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरही विरोधकांनी दलालीचे आरोप केले होते. त्यानंतर सोनिया गांधीही या टीकेच्या भडिमारातून बचावल्या नव्हत्या. इटालियन दलाल ओटाव्हिओ क्वात्रोचीवरून त्यांच्यावर आणि काँग्रेस पक्षावर जबरदस्त टीका करण्यात आली.

वाचा- सर्व अॅप्सचा ‘राजा’ ठरेल अशा गुगल अॅंड्रॉइड इंस्टंट अॅपची चाचणी सुरू

बोफोर्स तोफा त्यानंतर प्रकाशझोतात आल्या त्या १९९९च्या कारगिल युध्दाच्या वेळी. भारतीय ठाण्यांचा ताबा घेतलेल्या पाकिस्तानी सैनिकांना हुसकावताना बोफोर्स तोफांनी महत्त्वाची कामगिरी बजावली होती.

या बोफोर्स तोफांमध्ये अाणखी सुधारणा करण्यात येऊन आता त्या भारतीय सेनादलांच्या सेवेत दाखल होणार आहेत. आणि या तोफांच्या सामर्थ्याची झलक प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात मोठ्या दिमाखात संपूर्ण जगाला दिसणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian bofors to get unveiled on republic day

ताज्या बातम्या