US Visa Rejected Reasons for Indian Businessman Swapnil Shrivastava: अमेरिकेत जाण्यासाठी पर्यटन व्हिसा काढताना एका भारतीय उद्योगपतीला वेगळाच अनुभव आला. बांबूपासून लहान मुलांचे कपडे तयार करण्याचा उद्योग उभारणाऱ्या स्वप्नील श्रीवास्तव यांचा व्हिसा नाकारण्यात आला. तुमचे भारताशी पुरेसे संबंध नाहीत, असे कारण देण्यात आले. “मी शून्यातून ‘सिरीज ए’ ची कंपनी निधी मिळवून उभारली. १०० हून अधिक लोकांना रोजगार दिला. माझ्या कंपनीच्या पाठिशी मोठमोठे गुंतवणूकदार आहेत. आमच्या ब्रँडशी लाखो भारतीय जोडले गेले आहेत. तरीही माझे मायदेशाशी पुरेसे संबंध नाहीत, असे दिसते”, अशी प्रतिक्रिया स्वप्नील श्रीवास्तव यांनी दिली.

अमेरिकेने व्हिसा नाकारला असला तरी आपण पुन्हा एकदा व्हिसासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्वप्नील श्रीवास्तव यांनी सांगितले. कारण उद्योजकांना नाही ऐकायची सवय झालेली असते. म्हणून काही ते आपले ध्येय सोडत नाहीत. तसेच इतरही काही उद्योगपतींना अशाच कारणासाठी व्हिसा नाकारला गेला होता.

“मी भारतात कंपनी चालवतो. या कंपनीसाठी मागच्या पाच वर्षांत मी दिवसाचे २४ तास दिले. माझे आई-वडील इथेच राहतात. त्यांच्या सहवासात मी राहतो. भारतात परतण्यासाठी माझ्याकडे अशी अनेक कारणे आहेत”, अशी माहिती देताना स्वप्नील यांनी भारतात परत येण्यासंबंधीची कारणे दिली. तसेच मला माझ्या कंपनीकडून आर्थिक मोबदला मिळतो, याचा पुरावाही त्यांनी सादर केला.

भारतीय उद्योगपतींना व्हिसा का नाकारला जातो?

अनेक भारतीय उद्योजक हे देशात कंपनी चालवतात. त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतन देतात. मात्र व्हिसा अधिकाऱ्यांना वाटते की, हे काम ते अमेरिकेत बसूनही करू शकतात. त्यामुळेच बी१ / बी२ व्हिसावर काम करणारे भारतीय उद्योजक अमेरिकेला गेल्यानंतर त्यांचा विचार बदलणार नाही, याची कोणतीही शाश्वती नसते. अमेरिकेत गेल्यानंतर त्यांच्या मनात तिथेच स्थायिक होण्याचा विचार येऊ शकतो.

विवाहित किंवा भारतात मुले असलेल्या उद्योजकांचा मायदेशाशी अविवाहित व्यक्तीपेक्षा अधिक संबंध असतो. अविवाहित व्यक्तीचे पालक भारतात असले तरी तेवढे संबंध पुरेसे नसल्याचे व्हिसा अधिकाऱ्यांना वाटू शकते.

सोशल मीडियावर लोक काय म्हणाले?

स्वप्नील श्रीवास्तव यांनी एक्सवर पोस्टद्वारे हा विषय मांडला. तसेच यातून काही तोडगा आहे का? असे विचारत सूचनाही मागितल्या. एका व्यक्तीने कमेंटमध्ये एक युक्ती दिली. त्याने सांगितले की, अमेरिकेत होणाऱ्या एखाद्या कार्यक्रमाचे तिकीट काढावे आणि त्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी व्हिसा मागावा. या व्यक्तीने पुढे म्हटले की, यामुळे अनेक प्रश्न निकाली लागतात आणि पुढची प्रक्रिया सुरळीत होते.

दुसऱ्या एका युजरने लिहिले, “हे खूप दुर्दैवी आहे. माझ्या एका मैत्रिणीने चार वर्ष अमेरिकेत घालवली. तिच्याकडे ओ1 व्हिसा होता. जेव्हा ती भारतात आली, तेव्हा तिचा याच कारणास्तव व्हिसा नाकारण्यात आला.” आणखी एका युजरने श्रीवास्तव यांना पाठिंबा दिला. त्याने म्हटले, “तुम्हाला पुढच्या प्रयत्नासाठी शुभेच्छा. माझ्या पासपोर्टवर अमेरिकेचा शिक्का बसण्याआधी पाच वेळा माझा व्हिसा फेटाळला गेला होता.”