Indian Pilot Prevent Flydubai Hijack Attempt: दुबईहून इस्रायलची राजधानी तेल अवीवला जाणाऱ्या फ्लायदुबई कंपनीच्या विमानात वैमानिकावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडल्यानंतर आता या घटनेचे इतर पैलू समोर येत आहेत. इस्रायलमधील वृत्त संकेतस्थळ वायनेट न्यूजने विमानातील प्रवाशांच्या प्रतिक्रियेच्या हवाल्याने बातमी दिली असून भारतीय वैमानिकाच्या प्रसंगावधानामुळे मोठा दहशतवादी हल्ला टळला गेला, असे या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान विमानातील हल्ल्याचे व्हिडीओ सध्या समोर आले असून त्यात रक्तबंबाळ झालेले काही प्रवासी दिसत आहेत.

वायनेटने दिलेल्या वृत्तानुसार, सह-वैमानिकाने फ्लायदुबईचे विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप काही प्रवाशांनी केला आहे. एका प्रवाशाचा व्हिडीओ समोर आला असून तो म्हणतो, आमच्या विमानाचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. दरम्यान आम्ही सह-वैमानिकाला ताब्यात घेतले असून विमान लँड करण्याची तयारी करत आहोत. जे कुणी आम्हाला ऐकत असतील त्यांनी कृपया आम्हाला मदत पाठवावी. आम्ही सौदी अरेबियात विमान उतरवत असून आम्हाला तिथली काही माहिती नाही.

या प्रवाशाने पुढे म्हटले की, पायलट वगळता विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. तसेच विमानातील आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात मुख्य वैमानिक जखमी झालेला दिसत असून त्याच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न प्रवासी करत आहेत.

वायनेट संकेतस्थळात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या भगिनी आणि बँक ऑफ लेउमीच्या सीईओ जविक मनेस यांनी सांगितले की, प्रवाशांनी हल्लेखोराला ताब्यात घेण्यात पुढाकार घेतला. मनेस यांनी सांगितले की, या सर्व झटापटीत त्याही सामील होत्या.

भारतीय वैमानिकाने दहशतवादाचा कट उधळला

इस्रायली यंत्रणेने हल्ल्याच्या घटनेचे मूल्यमापन केले असून वायनेटन्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सह-वैमानिकाने विमान जाणुनबुजून कोसळवण्याचा प्रयत्न केला. यंत्रणेला यामागे दहशतवादी घातपाताचा संशय आहे. सह-वैमानिक हा ओमानचा नागरिक असल्याचे वायनेटच्या वृत्तात म्हटले आहे. तसेच वैमानिक भारतीय नागरिक असून त्याने सह-वैमानिकाशी दोन हात करत विमानाचा अपघात होण्यापासून रोखले, अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी वायनेटला दिली.

सौदी अरेबियातील ताबुक आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान उतरविण्यात आले आहे. विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही वैमानिकांवर सध्या उपचार सुरू आहेत.

दुबई ते सौदी अरेबिया, विमानात काय काय घडलं?

फ्लायदुबई FZ1073 या विमानाने दुबईहून सकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी उड्डाण घेतले. सव्वा तीन तासांनी हे विमान तेल अवीवमध्ये उतरणे अपेक्षित होते. मात्र सकाळी ८ वाजून २१ मिनिटांनी तेल अवीवच्या जवळ पोहोचताच विमान वेगाने खाली आल्याचे जाणवले. ३० सेकंदात विमानाची उंची १४ हजार फूटांनी कमी झाली. सकाळी ८:३१ वाजता विमानाने 7700 हा इमर्जन्सी कोड प्रसारित केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर आपत्कालीन परिस्थितीत हा कोड प्रसारित केला जातो.

सकाळी ८:३८ ला कोड 7500 सक्रिय झाला. विमानात बेकायदेशीर किंवा अपहरणसदृश्य घटनेसंबंधी हा कोड प्रसारित केला जातो. यानंतर इस्रायलच्या लष्कराने तात्काळ दोन लढाऊ विमाने पाठवून परिस्थितीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू आणि संरक्षण मंत्री इस्रायल कात्झ यांनी तातडीची बैठक बोलावली.

सकाळी ९ वाजून ३५ मिनिटांनी सदर विमान सौदी अरेबियाच्या दिशेने वळवल्याचे आणि तिथेच उतरणार असल्याचे जाहीर करण्यात आले. दहा मिनिटांनी ९ वाजून ४५ मिनिटांनी ताबुक विमानतळावर विमान उतरविण्यात आले. इस्रायली यंत्रणेने विमानातील प्रवाशांना सुखरूप विमानाबाहेर काढले. तसेच सुरक्षा यंत्रणांनी घटनेचा तपास सुरू केला.