scorecardresearch

Turkey Earthquake: १४ दिवसांनी भारतात परतणार होता; दुर्दैवाने भूकंपाने हिरावलं विजयचं आयुष्य

टर्कीत आलेल्या महाप्रलयकारी भूकंपाने मोठा विध्वंस केला आहे. त्याच्या झळा भारतापर्यंत पोहोचल्या आहेत. या भूकंपात एका भारतीय नागरिकाने त्याचा जीव गमावला आहे.

Earthquake In Turkey
टर्कीत आलेल्या महाप्रलयकारी भूकंपात एका भारतीयाने आपला जीव गमावला आहे.

Earthquake In Turkey : टर्कीत आलेल्या महाप्रलयकारी भूकंपात एका भारतीयाने आपला जीव गमावला आहे. मुळचे उत्तराखंडमधील पौडी गढवाल येथील रहिवासी असलेले विजय कुमार गौड (३६) यांचं कुटुंब विजय सुखरूप असावेत अशी प्रार्थना करत होतं. त्यांची पत्नी आणि ६ वर्षांचा मुलगा विजय सुखरूप असावेत अशी प्रार्थना देवाकडे करत होते. त्यांना वाटत होतं की, टर्कीतल्या विध्वंसादरम्यान काहीतरी चमत्कार व्हावा आणि विजय सुखरूप असल्याची बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचावी असं विजय यांची पत्नी आणि मुलाला वाटत होतं. परंतु असं झालं नाही.

ज्या हॉटेलमध्ये विजय कुमार राहात होते तिथल्या इमारतीच्या मलब्याखाली विजय यांचा मृतदेह सापडला आहे. विजय ६ फेब्रुवारी रोजी सकाळी तिथे गेले होते. मलब्याखाली अडकेल्या त्यांच्या शरिराचा चेंदामेंदा झाला होता. चेहऱ्याची ओळख पटत नव्हती. परंतु हातावर असलेल्या ओमच्या टॅटूमुळे त्यांची ओळख पटली.

टर्कीतल्या भारतीय दूतावासाने शनिवारी ट्विट केलं की, ‘आम्ही एक दुःखाद बातमी कळवत आहोत की, ६ फेब्रुवारीच्या भूकंपानंतर टर्कीमध्ये बेपत्ता झालेल्या असलेल्या विजय कुमार या भारतीय नागरिकाच्या मृतदेहाचे काही भाग सापडले आहेत. टर्कीमधल्या मलत्या येथील हॉटेलच्या ढिगाऱ्याखालून त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. विजय टर्कीला एका बिझनेस ट्रिपला गेला होता.

विजय यांचं पार्थिव शरीर सर्वप्रथम टर्कीतलं सर्वात मोठं शहर इस्तंबूल येथे आणलं जाईल. तिथून त्यांचं पार्थिव दिल्लीला पाठवलं जाईल. भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, विजय यांचं पार्थिव त्यांच्या गावी पोहोचण्यास तीन दिवस लागतील.

हे ही वाचा >> पाकिस्तानमध्ये हिंसक जमावाचा पोलीस ठाण्यावर हल्ला; आरोपीला निर्वस्त्र करून बेदम मारहाण करत केलं ठार!

१४ दिवसांनी भारतात परतणार होते विजय

विजय हे बंगळुरूमधील ऑक्सी प्लांट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत इंजिनियर म्हणून काम करत होते. त्यांच्या घरी त्यांची आई, पत्नी आणि ६ वर्षांचा मुलगा असा परिवार आहे. दिड महिन्यांपूर्वी विजय यांच्या पित्याचं निधन झालं आहे. विजय हे २२ जानेवारी रोजी अंतालिया येथे कुल्कु गाझ या तुर्की औद्योगिक गॅस पुरवठा कंपनीसाठी एसिटिलीन गॅस प्लांटचे बांधकाम आणि कार्यान्वित करण्यासाठी गेले होे. २० फेब्रुवारी रोजी म्णजेच भूकंपाच्या १४ दिवसांनंतर ते भारतात परतणार होते. परंतु आता त्यांच्याऐवजी त्यांचं पार्थिव मायदेशी पाठवलं जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 12-02-2023 at 08:20 IST