लोकसभेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असताना जागतिक नाणे निधीचा(आयएमएफ) एक अहवाल भारतीय राजकारण्यांच्या तोंडचे पाणी पळवणार आहे. राजकीय पुढाऱयांच्या सभांना जरी गर्दी दिसत असली तरी २०१३ मध्ये लोकांच्या राजकारण्यांवरील विश्वासाने आजपर्यंतचा निचांक गाठला आहे. विशष म्हणजे, राजकियदृष्ट्या अस्थिर असलेल्या पाकिस्तानचा क्रमांक मात्र, राजकारण्यांवरील विश्वासाच्या यादीमध्ये बराच वर आहे. पाकिस्तान ११० व्या क्रमांकावर असून, भारत ‘ब्रिक्स’ देशांच्या सर्वात खालच्या स्थानावर आहे.
“लोकांचा राजकारण्यांवरील विश्वास २००९ पासून खालावत चालला आहे,” असे ‘आयएमएफ’ च्या ‘द ग्लोबल कॉम्पिटीटीव्हनेस रिपोर्ट २०१३-१४’मध्ये नमूद करण्यात आले आहे.    
‘संपुआ’च्या सत्तेच्या दुसऱ्या पर्वात राजकारण्यांवरील विश्वासार्हता कमी होण्यास सुरूवात झाली.  मे २००९ मध्ये ‘संपुआ’ दुसऱ्यांदा सत्तेमध्ये आली असून, तेव्हापासून लोकांच्या राजकारण्यांवरील विश्वासामध्ये घट झाली आहे. जगातील १४८ देशांमध्ये लोकांच्या राजकारण्यांवरील विश्वासामध्ये भारत ११५ व्या स्थानावर आहे.”भारताचा क्रमांक २०१० पासून ३० क्रमांकांनी घसरून ११५ वर जाऊन पोहचला आहे,” असे ‘आयएमएफ’चा अहवाल म्हणतो.