पीटीआय, नवी दिल्ली

भारतीय तटरक्षक दलाने (आयसीजी) मध्यसमुद्रात केलेल्या कारवाईत आंतरराष्ट्रीय तेल तस्करी करणाऱ्या टोळीवर कारवाई केली असून या प्रकरणाशी संबंधित काही जहाजे ताब्यात घेतली आहेत. ‘आयसीजी’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईपासून सुमारे १०० सागरी मैल अंतरावर ही कारवाई करण्यात आली.

संबंधित जहाजांनी संघर्षग्रस्त देशांमधून मोठ्या प्रमाणात स्वस्त तेल आणि तेल-आधारित माल तस्करी करण्याची आणि समुद्रात मध्यभागी मोटर टँकरमध्ये हस्तांतरित करून नफा कमावण्याची एक पद्धत विकसित केली होती, असे ‘आयसीजी’ने सांगितले. त्यासाठी डिजिटल पाळत ठेवण्यात आली. या ‘धाडसी सागरी मोहिमे’मुळे भारत पुन्हा एकदा सागरी सुरक्षितता देणारा आणि आंतरराष्ट्रीय नियमाधारित व्यवस्थेची अंमलबजावणी करणारा देश असल्याचे अधोरेखित होते, असे तटरक्षक दलाने म्हटले आहे.

५ फेब्रुवारी रोजी तटरक्षक दलाच्या जहाजांनी मुंबईच्या पश्चिमेला सुमारे १०० सागरी मैलांवर तीन जहाजे अडवली. त्यानंतर सातत्याने तपासणी, संशयित जहाजांवरील इलेक्ट्रॉनिक माहितीची पडताळणी, कागदपत्रांची तपासणी आणि कर्मचाऱ्यांची चौकशीतून गुन्हेगारांची कार्यपद्धती आणि घटनाक्रम उघड झाला, असे तटरक्षक दलाने सांगितले.

यंत्रणांना चुकवण्यासाठी ही जहाजे वारंवार आपली ओळख बदलत असल्याचे तपासात आढळून आले. प्राथमिक तपासानुसार, या जहाजांचे मालक परदेशातील असल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही टोळी विविध देशांतून कार्यरत असलेल्या मध्यस्थांच्या जाळ्याच्या माध्यमातून समुद्रातील जहाजांदरम्यान तेलाची विक्री व हस्तांतरण समन्वयाने करत होती, असेही सांगण्यात आले.