अमेरिकन सैन्यानं परतीचा रस्ता धरताच अफगाणिस्तानात तालिबानने डोकं वर काढलं असून, वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. काही दिवसांपूर्वीच अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला. या दाव्यानंतर अफगाणिस्तानातील परिस्थिती पुन्हा बिघडण्याची चिन्हं दिसत आहे. यातच अफगाणिस्तानातील कंदहारमध्ये असलेला भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याचं वृत्त समोर आलं होतं. या वृत्तावर राजनैतिक सूत्रांनी खुलासा केला आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर काही तासांतच तालिबानने अफगाणिस्तानचा ८५ टक्के भाग ताब्यात घेतल्याचं म्हटलं होतं. तालिबानचं वाढत वर्चस्व लक्षात घेऊन अफगाणिस्तानातील भारतीय दूतावास बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. मात्र, राजनैतिक सूत्रांनी याबद्दल स्पष्टीकरण दिलं असून, दूतावास पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं वृत्त फेटाळून लावलं आहे.

Taliban say they control 85% of Afghanistan
अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भूभागावर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबान या दहशतवादी संघटनेकडून करण्यात आला आहे. या दाव्यानंतर अफगाणिस्तान सरकारने सुरक्षा व्यवस्थेत वाढ केली आहे. हैरात प्रातांतील गुजारा जिल्ह्याच्या सीमेवर नागरिकांची तपासणी करताना अफगाणिस्तानी सुरक्षा दलाचे जवान. (Photo : REUTERS/Jalil Ahmad)

हेही वाचा- अफगाणिस्तानच्या ८५ टक्के भागावर तालिबानने मिळवला कब्जा

भारत सरकारने अफगाणिस्तानातील कंदहार येथे असलेलं भारतीय दूतावास कार्यालय बंद केलेलं नाही. सुरक्षेच्या कारणास्तव कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. दूतावासात आता फक्त अत्यावश्यक सेवा सुरूच राहतील. दूतावास बंद केल्याचं वृत्त चुकीचं आहे, असं राजनैतिक सूत्रांनी म्हटलं आहे.

अफगाणिस्तान तालिबानने पुन्हा हालचाली सुरू केल्यानं भारताने कंदहारमधील दूतावास बंद केल्याची माहिती समोर आली होती. हे वृत्त राजनैतिक सूत्रांनी फेटाळलं. मात्र, सुरक्षा आणि खबरदारीचा उपाय म्हणून भारताने कंदहार दूतावासातील ५० टक्के कर्मचारी आणि आयटीबीपी जवानांना हवाई दलाच्या विशेष विमानाने भारतात आणले आहे. या कर्मचाऱ्यांना दिल्लीत आणलं गेलं असून, अचानक ही पावलं टाकण्यात आली. तालिबान कंदहारवरही कब्जा मिळवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पूर्वी कंदहार हेच तालिबानचं मुख्यालय होतं. त्यामुळे भारताने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान, काबूलमधील आणि बाल्ख प्रातांतील मजार-ए-शरीफ हे दोन्ही दूतावास सुरू ठेवण्यात आलेले आहेत.