Hantavirus latest news update : जगावर पुन्हा एका नव्या व्हायरसचे संकट घोंघावत असतानाच एमव्ही होंडियस जहाजावरील कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान, दोन भारतीय कर्मचाऱ्यांना हंताव्हायरसची लागण झाल्याच्या संशयावरून त्यांना नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले आहे. तिथे त्यांना क्वारंटाईन करण्यात येणार आहे. मॅड्रिडमधील भारतीय दूतावासाने ही माहिती दिली असून जहाजावरील सर्व व्यक्ती रविवारी स्पेनमध्ये पोहोचले आहेत. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

कर्मचाऱ्यांना विलगीकरणात ठेवणार

स्पेनमधील भारतीय दूतावासाने कळवले आहे की, “जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि स्पेनच्या अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या नियमानुसार जहाजावरील प्रवाशांना खाली उतरवण्यात आले आहे. स्पॅनिश नॅशनल सेंटर फॉर इमर्जन्सी मॉनिटरिंग अँड कोऑर्डिनेशन (CENEM) कडून मिळालेल्या माहितीनुसार, क्रू मेंबर म्हणून प्रवास करणाऱ्या दोन भारतीय नागरिकांना नेदरलँड्समध्ये हलवण्यात आले असून तिथे त्यांना विलगीकरणात (Quarantine) ठेवण्यात येईल.”

हंताव्हायरस संसर्गाची आठ प्रकरणे, तिघांचा मृत्यू

हे जहाज स्पेनच्या कॅनरी बेटांच्या किनारपट्टीवर नांगरलेले होते. या जहाजावर २३ देशांतील ५९ क्रू मेंबर्ससह एकूण १४७ लोक होते. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ‘डब्ल्यूएचओ’च्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, या जहाजावर संसर्गाची आठ संशयित प्रकरणे आढळली होती. त्यापैकी पाच जणांना प्रयोगशाळेतील चाचणीत संसर्ग झाल्याची पुष्टी झाली आहे, तर आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत ‘डब्ल्यूएचओ’ला या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात माहिती देण्यात आली होती. मृतांमध्ये एका प्रौढ पुरुषाचा समावेश आहे. त्याला ६ एप्रिल रोजी ताप, डोकेदुखी आणि सौम्य जुलाब झाले होते. ११ एप्रिलपर्यंत त्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला.

पहिल्या मृताच्या जवळच्या संपर्कात आलेल्या एका महिलेला २४ एप्रिल रोजी सेंट हेलेना येथे उतरल्यानंतर पोटाच्या तक्रारी जाणवू लागल्या. जोहान्सबर्गला जाणाऱ्या विमानात तिची प्रकृती बिघडली आणि २६ एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला. तसेच २८ एप्रिल रोजी ताप आणि अस्वस्थता जाणवणाऱ्या एका अन्य महिलेचा २ मे रोजी न्यूमोनियामुळे मृत्यू झाला.