Indian Crew Oil Tanker Attacked in Strait of Hormuz update : अमेरिका आणि इस्रायलने सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. ओमानच्या किनाऱ्याजवळील होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या एका तेल टँकरवर इराणने हल्ला केला आहे. यात १५ भारतीय क्रू होते असंही समोर आलं आहे. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
ओमानच्या दुक्म बंदरावर ड्रोन हल्ल्यानंतर झालेल्या हल्ल्यात पलाऊ ध्वज असलेल्या तेल टँकरवर ओमानच्या मुसंदम द्वीपकल्पात हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान चार जण जखमी झाले आहेत, असे ओमानच्या सागरी सुरक्षा केंद्राने (MSC) सांगितले. होर्मुझची सामुद्रधुनी हा जागतिक तेल वाहतुकीसाठी एक धोरणात्मक मार्ग आहे, ज्याला जगातील सर्वात संवेदनशील सागरी अडथळा म्हणून वर्णन केले जाते. काल इराणच्या नौदलाने दिलेल्या रेडिओ इशाऱ्यात असा दावा करण्यात आला होता की कोणत्याही जहाजाला अरुंद कॉरिडॉरमधून जाण्याची परवानगी नाही, त्यामुळे हा मार्ग धोक्यात आला.
तेल टँकरमधील कर्मचाऱ्यांना काढले बाहेर
ओमान एमएससीच्या म्हणण्यानुसार, स्कायलाईट नावाच्या या तेल टँकरमध्ये २० जणांचा क्रू होता, ज्यामध्ये १५ भारतीय आणि पाच इराणी नागरिक होते. मुसंदममधील खासाब बंदरापासून साडेनऊन किलोमीटर अंतरावर झालेल्या हल्ल्यानंतर क्रूला बाहेर काढण्यात आले.
“सागरी सुरक्षा केंद्राने घोषणा केली आहे की पलाऊचा ध्वज फडकवणाऱ्या तेल टँकरला (स्कायलाईट) मुसंदम गव्हर्नरेटमधील खासाब बंदराच्या उत्तरेस ५ नॉटिकल मैल अंतरावर लक्ष्य करण्यात आले होते आणि टँकरमधील सर्व क्रू सदस्यांना बाहेर काढण्यात आले आहे,” असे एमएससीने एका पोस्टमध्ये म्हटले आहे. तसंच, टँकरला कशाने धडक दिली याचा उल्लेख नाही.
अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिल्यानंतर आखाती देश नवीन युद्धात अडकला आहे, त्यामुळे ओमानमध्ये किंवा त्याच्या जवळ लक्ष्यावर हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. प्राथमिक माहितीचा हवाला देत केंद्राने पुढे म्हटले आहे की, चार क्रू मेंबर्सना दुखापती झाल्या आहेत आणि त्यांना उपचारासाठी नेण्यात आले आहे.
