द इंडियन एक्स्प्रेस समूह आणि ओपनएआय यांनी आज धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली. या भागीदारीचा उद्देश समूहातर्फे केल्या जाणाऱ्या खऱ्या पत्रकारितेचा मजकूर अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. या भागीदारीमुळे एक्स्प्रेस समूहाच्या सहभागी प्रकाशनांमधील बातम्या व इतर मजकूर चॅटजीपीटीवर अधिक प्रभावीपणे उपलब्ध होऊ शकेल. चॅटजीपीटीवर विचारणा करण्यात आलेल्या प्रश्नांच्या उत्तरादाखल जेव्हा संबंधित बातम्यांचे सारांश किंवा उतारे दाखवले जातील, तेव्हा त्यासोबत ते जिथून घेण्यात आलेत त्या संबंधित वृत्तसंस्थेचे नाव स्पष्टपणे नमूद केले जाईल. त्याशिवाय, मूळ बातमीची लिंकही उपलब्ध करून दिली जाईल. यामुळे वाचकांना त्या प्रकाशकाच्या वेबसाईटवर जाऊन संपूर्ण बातमी आणि सखोल विश्लेषणदेखील वाचता येईल.
या भागीदारीच्या पहिल्या टप्प्यात द इंडियन एक्स्प्रेस, द फायनान्शियल एक्स्प्रेस यांच्यावरील मजकूराचा समावेश असेल. याशिवाय लाईव्ह रिपोर्टिंग कव्हरेजदेखील यात समाविष्ट असेल. त्याचबरोबर इंग्रजी, हिंदी, मराठी, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि गुजराती या ७ भाषांमधील संग्रहित करण्यात आलेला मजकूरदेखील उपलब्ध असेल.
इंडियन एक्स्प्रेस डिजिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदगोपाल राजन म्हणाले, “शोध पत्रकारितेचा प्रवाह निश्चित करणे, बातम्या सर्वप्रथम देणे आणि राजकीय विचारांच्या विविध प्रवाहांना सामावून घेणारं आमचं व्यापक वृत्तांकन यामुळे एक्स्प्रेस समूहाने भारतीय माध्यमविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आम्ही नेहमीच नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार खुलेपणाने केला आहे. या भागीदारीमुळे वाचकांना आमच्या देशभरातील पत्रकारांच्या व्यापक नेटवर्कने केलेले सखोल आणि काटेकोर वृत्तांकन वाचण्यसाठी एक नवा मार्ग उपलब्ध झाला आहे. यामध्ये बातमीच्या मूळ संकेतस्थळाचा स्पष्ट उल्लेख आणि त्या संकेतस्थळापर्यंत थेट पोहोचण्याची सुविधा उपलब्ध असेल.”
ते पुढे म्हणाले, “तंत्रज्ञानामुळे लोक माहिती शोधण्याची आणि तिचा वापर करण्याची पद्धत बदलत असताना, आमचं प्राधान्य विश्वसनीय पत्रकारिताच राहणार आहे. त्यामुळे आम्ही प्रकाशित करत असलेल्या प्रत्येक मजकुराची संपूर्ण संपादकीय जबाबदारी आमची असेल.”
ओपनएआय मीडिया पार्टनरशिपचे उपाध्यक्ष वरुण शेट्टी म्हणाले, “द इंडियन एक्स्प्रेसला सखोल शोध पत्रकारिता आणि निष्पक्ष वृत्तांकनाची प्रदीर्घ परंपरा आहे. भारताची व्यापकता आणि गुंतागुंत समजून घेण्यासाठी हे वृत्तांकन महत्त्वाचे आहे. एआयच्या मदतीने इंडियन एक्स्प्रेसचा मजकूर स्पष्ट स्रोत-उल्लेख आणि मूळ बातम्यांच्या थेट लिंकसह अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावा अशी आमची इच्छा आहे.”
ते म्हणाले, “प्रकाशकांसोबत रचनात्मक पद्धतीने काम करण्याच्या आणि पत्रकार, वाचक तसेच सक्षम वृत्तव्यवस्थेला पाठबळ देणारे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या आमच्या वचनबद्धतेचे हे प्रतिबिंब आहे.”
यात द इंडियन एक्स्प्रेस समूहाचा आपल्या पत्रकारितेवर संपूर्ण आणि स्वायत्त संपादकीय नियंत्रण कायम असणार आहे. समूह कोणत्या बातम्या प्रकाशित करणार? त्या कशा पद्धतीने तयार केल्या जातील? किंवा त्यामधून कोणते संपादकीय निष्कर्ष मांडले जातील? हे ठरवण्यामध्ये ओपनएआयची कोणतीही भूमिका असणार नाही.
या भागीदारीचा आणखी एक भाग म्हणून, वाचकांसाठी वृत्तवाचनाचा अनुभव अधिकाधिक चांगला कसा करता येईल तसेच एक्स्प्रेस समूहातील बातम्यांसंदर्भातील दैनंदिन कामकाज अधिक कार्यक्षम करण्यासाठी ओपनएआयचे तंत्रज्ञान कशा प्रकारे वापरता येईल, याचा दोन्ही संस्था अभ्यास करतील.
यामध्ये संग्रहित बातम्यांचा शोध, संशोधन, माहितीचं विश्लेषण, भाषांतर, वाचकांसाठीच्या सेवा आणि व्यावसायिक कामकाज अशा विविध बाबींचा समावेश होऊ शकतो. या तंत्रज्ञानाचा संपादकीय वापर करताना एक्स्प्रेस समूहाची संपादकीय मानके, धोरणे आणि मानवी देखरेख कायम राहणार आहे.
वाचकांसाठी विश्वसनीय माहिती अधिकाधिक सहज उपलब्ध होणे, प्रकाशकांसाठी एआयची जबाबदार यंत्रणा विकसित करणे वापर विकसित करण्यासाठी आणि मूळ पत्रकारितेशी वाचकांना नव्या पद्धतीने जोडण्यासाठी ओपनएआय जगभरातील वृत्तसंस्थांसमवेत करत असलेल्या प्रयत्नांचा पुढचा टप्पा म्हणजे ही भागीदारी आहे.
