नवी दिल्ली : माहितीचा स्फोट आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वेगाने बदलणार्या जगात निष्पक्ष, सखोल आणि सत्यशोधक पत्रकारिता अधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘द इंडियन एक्स्प्रेस ग्रुप’ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य ‘ओपनएआय’ या जागतिक संस्थेने एका धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली.
या सहकार्यामुळे ‘चॅटजीपीटी’ वापरणार्या जगभरातील वाचकांना ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहातील दैनिकांची शोधपत्रकारिता, धाडसी वार्तांकन आणि विश्लेषणात्मक लेख थेट, अधिकृत स्रोताच्या उल्लेखासह आणि मूळ बातमीच्या लिंकसह उपलब्ध होणार आहे.
या भागीदारीअंतर्गत ‘द इंडियन एक्स्प्रेस’, ‘द फायनान्शियल एक्स्प्रेस’ यांसह समूहाच्या व्यावसायिक प्रकाशनांमधील मजकुराचा समावेश असेल. यामध्ये मराठी (लोकसत्ता), इंग्रजी, हिंदी, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि गुजराती या सात भाषांमधील ताज्या बातम्यांसह डिजिटल अर्काइव्हमधील (जुन्या नोंदी) विश्लेषणाचा समावेश असेल. ‘चॅटजीपीटी’वर जेव्हा एखादा वापरकर्ता संबंधित विषयावर प्रश्न विचारेल, तेव्हा उत्तर देताना माहितीचा मूळ स्रोत म्हणून ‘एक्स्प्रेस समूहा’चा स्पष्ट उल्लेख केला जाईल. तसेच वाचकांना सविस्तर विश्लेषणासाठी मूळ संकेतस्थळावर जाण्यासाठी थेट ‘लिंक’ दिली जाईल.
‘इंडियन एक्स्प्रेस डिजिटल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी नंदगोपाल राजन यांनी या भागीदारीचे स्वागत करताना, समूहाच्या शोध पत्रकारितेची परंपरा, महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम वाचकांपर्यंत पोहोचविण्याची क्षमता आणि राजकीय मतप्रवाहांच्या पलीकडे विविध दृष्टिकोनांना दिले जाणारे स्थान ही समूहाची वैशिष्ट्ये असल्याचे सांगितले. नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यास समूह नेहमीच तयार राहिला असून, या भागीदारीमुळे देशभरातील पत्रकारांचे काम आणि त्यांचे काटेकोर वृत्तांकन नव्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचेल, असेही त्यांनी नमूद केले. तंत्रज्ञानामुळे माहिती शोधण्याची आणि ती वाचण्याची पद्धत बदलत असली तरी विश्वासार्ह पत्रकारिता आणि प्रकाशित मजकुराची संपूर्ण संपादकीय जबाबदारी ही समूहाची प्राथमिकता कायम राहील, असे राजन यांनी स्पष्ट केले.
‘ओपन एआय’चे माध्यम भागीदारी विभागाचे उपाध्यक्ष वरुण शेट्टी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या सखोल शोध पत्रकारितेच्या आणि निष्पक्ष वृत्तांकनाच्या परंपरेचा उल्लेख केला. भारताचे विविध पैलू आणि गुंतागूंत समजून घेण्यासाठी या पत्रकारितेचे महत्त्व असून, अधिकाधिक वाचकांना हे काम शोधता यावे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. बातमीचा स्रोत स्पष्टपणे नमूद करणे आणि मूळ बातमीची थेट ‘लिंक’ देणे हे प्रकाशकांबरोबरच रचनात्मक पद्धतीने काम करण्याच्या ‘ओपन एआय’च्या भूमिकेशी सुसंगत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारितेतील कामकाजासाठीही ‘एआय’चा वापर
वाचकांना नवे अनुभव देण्याबरोबरच समूहातील विविध कामकाजासाठी ‘ओपन एआय’च्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, याचाही दोन्ही संस्था शोध घेणार आहेत. जुन्या बातम्यांच्या संग्रहातून आवश्यक माहिती शोधणे, संशोधन, आकडेवारीचे विश्लेषण, भाषांतर, वाचक सेवा आणि व्यावसायिक कामकाज अशा क्षेत्रांचा त्यात समावेश आहे. पत्रकारितेशी संबंधित कोणत्याही कामात या तंत्रज्ञानाचा वापर करताना समूहाची संपादकीय धोरणे, मानके आणि मानवी नियंत्रण कायम राहणार आहे.
भागीदारी महत्त्वाची का?
जगभरातील वृत्तसंस्थांबरोबर विश्वासार्ह माहिती अधिक सहजपणे वाचकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘ओपन एआय’कडून सुरू असलेल्या प्रयत्नांचा हा भाग आहे. प्रकाशकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा जबाबदार वापर आणि वाचकांना मूळ पत्रकारितेशी जोडण्याचे नवे मार्ग विकसित करण्याच्या दिशेने ही भागीदारी महत्त्वाची ठरणार आहे.
संपादकीय स्वायत्तता कायम
या भागीदारीमुळे ‘इंडियन एक्स्प्रेस’ समूहाच्या संपादकीय स्वायत्ततेवर कोणताही परिणाम होणार नाही. समूह आपल्या पत्रकारितेवर पूर्ण आणि स्वतंत्र संपादकीय नियंत्रण कायम ठेवणार आहे. कोणत्या बातम्यांचे वृत्तांकन करायचे, त्या कशा पद्धतीने तयार करायच्या किंवा त्यातून कोणते संपादकीय निष्कर्ष मांडायचे, याबाबत ‘ओपनएआय’ची कोणतीही भूमिका असणार नाही.
