अमेरिका-कॅनडा सीमेवर गारठून मृत्यू झालेल्या त्या भारतीयांची ओळख पटली; मृतांमध्ये तीन वर्षाच्या बाळाचाही समावेश

ही व्यक्ती पत्नी आणि दोन मुलांसहीत १५ दिवसांपूर्वी कॅनडाला गेल्याची माहिती समोर आलीय.

Indian family that froze to death near US Canada border identified
१९ जानेवारी रोजी या चौघांचा मृत्यू झाला

कॅनडा- अमेरिका सीमेवर बर्फात गारठून मृत्यू झालेल्या चौघांची ओळख पटली आहे. मरण पावलेले चारही जण हे एकाच भारतीय कुटुंबाचे सदस्य असून हे सर्वजण गांधीनगरमधील कालोल तालुक्यातील दिनगुचा गावातील रहिवाशी असल्याची माहिती समोर आलीय. शुक्रवारी सकाळी अमेरिकेतील तपास अधिकाऱ्यांनी ही महिती सार्वजनिक केली. मरण पावलेले चारही जण गुजराती भाषिक होते, असे अमेरिकेच्या प्रतिनिधीने न्यायालयात यापूर्वीच सांगितले होते.

१९ जानेवारी रोजी हे कुटुंब कॅनडा आणि अमेरिकेच्या सीमेवर असणाऱ्या मानितोबा प्रांतामधून बेकायदेशीररित्या देशांच्या सीमा ओलांडून अमेरिकेच्या हद्दीत प्रवेश करीत होते, असा आरोप आहे. हे सर्वजण एका गटाने कॅनडातून बाहेर पडण्याच्या तयारीत होते, असे सांगितले जाते. यातील अन्य सात जणांना अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे.

ओटावा येथील भारतीय उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या पत्रकानुकास मरण पावलेल्यांमध्ये जगदीश पटेल (३९) त्यांची पत्नी वैशाली पटेल (३७) या दोघांबरोबरच त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ११ वर्षांची विहांगी आणि तीन वर्षाच्या धार्मिक पटेलचाही थंडीने गारठून मृत्यू झालाय.

जगदीश एक शिक्षक म्हणून काम करायचा. मात्र नंतर तो कालोल शहरामध्ये उपजिविकेसाठी अन्य उद्योगही करत होता. गावामध्ये जगदीशच्या वडीलांच्या नावे असणारं एक घर आहे. मात्र जगदीशचे वडील बलदेव पटेल हे सुद्धा गाव सोडून गेल्यापासून हे घर बंदच आहे. पर्यटक व्हिजाच्या आधारे जगदीश आपल्या पत्नी आणि दोन मुलांसहीत १५ दिवसांपूर्वी कॅनडाला गेला होता.

जगदीश यांच्या नातेवाईकांना या घटनेबद्दल कळवण्यात आल्याचं भारतीय उच्चायुक्तालयाकडून सांगण्यात आलंय. यासंदर्भात पटेल कुटुंबाला सर्व ते सहकार्य केलं जात असल्याचंही सांगण्यात आलं आहे. वातावरणामधील परिस्थितीमुळे या चौघांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख उच्चायुक्तालयाने जारी केलेल्या पत्रकात आहे.  गांधीनगरचे जिल्हाधिकारी कुलदीप आर्य यांनी ही दुर्दैवी घटना असल्याचं घटनेची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर म्हटलं होतं.

स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, याच गावातून आणखी तीन ते चार कुटुंबे बेपत्ता आहेत. याप्रकरणी अमेरिकेतील गृहखात्याचे विशेष अधिकारी जॉन डी. स्टॅनले यांनी मिनेसोटा न्यायालयात फौजदारी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाशी संबंधित भारतीय हे गुजराती भाषिक असून त्यांना इंग्रजी फारसे समजत नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian family that froze to death near us canada border identified scsg

Next Story
Coronavirus India : ओमायक्रॉनच्या नव्या उपप्रकाराने वाढवली चिंता; आधीच्या प्रकारापेक्षाही अधिक संसर्गजन्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी