पाकिस्तानात नुकत्याच आलेल्या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नागरिक बेघर झाले आहेत. अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान झाले असून महागाईदेखील प्रचंड वाढली आहे. भाजीपाल्यांचे भावही गगनाला भिडले आहेत. अशा परिस्थिती भारताकडून पाकिस्तानला आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – टीईटी घोटाळ्यासंदर्भात अंबादास दानवे यांचं मोठं विधान; म्हणाले, “माझ्याकडे सत्तारांविरोधात …”

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संकटाच्या काळात मानवतावदी दृष्टीकोन ठेवत भारत पाकिस्तानला मदत करण्याची शक्यता आहे. पाकिस्तानला कशाप्रकारे मदत करता येईल, यासाठी उपाय शोधण्यात येत असून यासंदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जर भारताकडून अशा प्रकारे मदत करण्यात आली तर २०१४ नंतर नैसर्गिक आपत्तीमुळे पाकिस्तानला मदत करण्याची ही पहिलीच वेळ असेल. यापूर्वी २००५ आणि २०१० मध्ये तत्कालीन यूपीए सरकारच्या काळात, भारताने पाकिस्तानला मदत केली होती.

हेही वाचा – गुलाम नबी आझादांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले “राहुल गांधी हे केवळ फोटो आणि धरणं आंदोलनासाठी…”

दरम्यान, पाकिस्तानमधील पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली आहे. “पाकिस्तानमध्ये पुरामुळे झालेला विध्वंस पाहून दुःख झाले. या नैसर्गिक आपत्तीत बाधित झालेल्या सर्वांच्या कुटुंबियांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर येण्याची आशा करतो, असे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

ताज्या आकडेवारीनुसार, या पुरामुळे पाकिस्तानमध्ये आतापर्यंत ११०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान सरकार भारतातून भाजीपाला आणि इतर खाद्यपदार्थ आयात करण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.