India Pakistan Water Dispute : काश्मीरच्या पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे भारत व पाकिस्तानमध्ये मोठा तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानी नाकेबंदी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याचाच एक भाग म्हणून भारताने पाकिस्तानबरोबरचा सिंधू जलकरार स्थगित केला आहे. आता केंद्र सरकार पाकिस्तानविरोधात आणखी एक मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. केंद्रीय जल आयोगाने काश्मीरमधील चिनाब नदीवरील सलाल व बगलिहार धरणांत होणारी फ्लशिंग एक्सरसाइज (धरणांतील गाळ काढण्याची प्रक्रिया) दर महिन्याला करण्याची शिफारस केली आहे. दी इंडियन एक्सप्रेसने यासंबंधीचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

भारत यापुढेही अशा एक्सरसाइज चालू ठेवणार असून याबाबत पाकिस्तानला कुठलीही पूर्वसूचना दिली जाणार नाही. कुठलाही हायड्रोलॉजिकल डेटा पाकिस्तानबरोबर शेअर केला जाणार नाही. भारताने सिंधू जल करार स्थगित केला असून या निर्णयावर केंद्र सरकार ठाम आहे. पंतप्रधानांनी अलीकडेच म्हटलं होतं की पाणी व रक्त एकत्र वाहणार नाही.

फ्लशिंग एक्सरसाइज म्हणजे काय?

जलाशय अथवा धरणातील गाळ, कचरा वाढल्यानंतर त्या धरणाची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. अशा वेळी हा गाळ काढण्यासाठी धरणातील पाणी हायड्रॉलिक पद्धतीचा अवलंब करून अधिक वेगाने सोडलं जातं. या पाण्याबरोबर गाळ व इतर कचरा बाहेर पडतो आणि धरणाची साठवणूक क्षमता वाढते. यामुळे धरणाच्या हायड्रो पॉवर आउटपुटवरही परिणाम होतो. सातत्याने अशी फ्लशिंग एक्सरसाइज केल्याने धरण स्वच्छ होतं, टर्बाइन अधिक चांगल्या पद्धतीने काम करू लागतं, धरणांवरील वीजनिर्मिती प्रकल्पांची क्षमता वाढते, हायड्रॉलिक प्लान्टचं आयुष्य वाढतं.

दी इंडियन एक्सप्रेसने ४ मे रोजी एक वृत्त प्रसिद्ध केलं होतं. यामध्ये म्हटलं होतं की एनएचपीसी व जम्मू-काश्मीर प्रशासनाने सलाल व बगलिहार धरणांची स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. कारण या धरणांवरील वीजनिर्मिती प्रकल्पांची उत्पादन क्षमता घटली होती. सलाल धरण १९८७ मध्ये तर बगलिहार धरण २००८ मध्ये बांधण्यात आलं असून यंदा या धरणांवर पहिल्यांदाच फ्लशिंग एक्सरसाइज करण्यात आली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पाकिस्तानचा आक्षेप

पाकिस्तानने सातत्याने या फ्लशिंग एक्सरसाइजवर आक्षेप घेतला आहे. कारण फ्लशिंगमुळे धरणांतील गाळ व कचरा सीमेपलिकडे जातो. तसेच या फ्लशिंगदरम्यान वेगाने पाणी सोडल्यामुळे सीमेपलिकडे अचानक नदीच्या पाण्याची पातळी वाढते, पूरासारखी स्थिती निर्माण होते.