अमेरिकेत गेल्या २७ वर्षांपासून वैधपणे राहणाऱ्या आणि ‘ग्रीन कार्ड’ धारक असलेल्या भारतीय वंशाच्या एका ज्येष्ठ महिलेला अमेरिकेच्या ‘इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट’ (ICE) या इमिग्रेशन विभागानं अचानक ताब्यात घेतले आहे. या विभागाचे मुख्य काम अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहणाऱ्या लोकांना शोधणे आणि त्यांना ताब्यात घेणे हे आहे. वेंकटा वसमशेट्टी असं या महिलेचं नाव असून, त्या नॉर्थ कॅरोलिनामध्ये विशेष गरजा असणाऱ्या (दिव्यांग) मुलांच्या शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे, काही महिन्यांपूर्वीच एका इमिग्रेशन न्यायाधीशानं त्यांच्या विरोधातील हकालपट्टीची कारवाई रद्द केली होती. तरीही झालेल्या या अटकेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात मोठी खळबळ उडाली आहे.
अटकेमागचं नेमकं कारण काय?
अमेरिकन प्रशासनाच्या दाव्यानुसार, २०२२ मध्ये कोरोना महामारीच्या काळात वेंकटा वसमशेट्टी या आपल्या आजारी पालकांची देखभाल करण्यासाठी आणि स्वतःवरील उपचारासाठी काही महिने भारतात राहिल्या होत्या. अमेरिकन इमिग्रेशन नियमांनुसार ग्रीन कार्डधारक व्यक्ती जास्त काळ देशाबाहेर राहिल्यास, तिने अमेरिकेचे कायमचे रहिवासीपण सोडले (Abandoned Residency) असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो. याच मुद्द्यावर बोट ठेवून ICE ने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
मात्र, वेंकटा वसमशेट्टी यांच्या वकिलांनी आणि कुटुंबानं हे दावे पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. भारतात असतानाही त्यांचे अमेरिकेतील घर, नोकरी आणि कौटुंबिक नातेसंबंध कायम होते; त्यामुळे त्यांनी रहिवासीपण सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असा युक्तिवाद त्यांच्या वकिलांनी केला आहे.
२७ वर्षांचा निष्कलंक रेकॉर्ड; कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही
वसमशेट्टी २०१३ पासून अमेरिकेच्या अधिकृत ‘ग्रीन कार्ड धारक’ आहेत. त्यांच्या वकील मैत्रीण झोई विल्सन यांनी सोशल मीडियावर लिहिले की, “वसमशेट्टी यांच्यावर कोणताही गुन्हेगारी ठपका नाही. त्या गेल्या तीन दशकांपासून अमेरिकेत अतिशय प्रामाणिकपणे आणि कायद्याचे पालन करत राहत आहेत.”
नियमित तपासणीसाठी गेल्या असताना त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले असून सध्या त्यांना जॉर्जियातील ‘इरविन काउंटी डिटेंशन सेंटर’मध्ये ठेवण्यात आले आहे.
न्यायालयाचे प्रशासनाला खडे बोल; ३ दिवसांत उत्तर देण्याचे आदेश
या कारवाईविरोधात वासमशेट्टी यांच्या कायदेशीर टीमने तातडीने न्यायालयात ‘हॅबियस कॉर्पस’ (Habeas Corpus – बेकायदेशीर अटकेविरोधातील याचिका) दाखल केली आहे. या याचिकेची दखल घेत फेडरल न्यायाधीशांनी १३ ऑगस्ट रोजी इमिग्रेशन विभागाला (ICE) दणका दिला. न्यायालयाने ICE ला पुढील तीन दिवसांत या अटकेमागील कायदेशीर आधार आणि स्पष्टीकरण सादर करण्याचे कडक आदेश दिले आहेत.
