सध्या हवामान बदल आणि त्याचा जगावर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी जागतिक हवामान बदल परिषदही घेण्यात आली. यात जगभरातील देशांच्या प्रमुखांनी हजेरी लावत आपल्या भूमिका व्यक्त केल्या. त्यात अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स या देशांची भूमिका महत्त्वाची दिसत आहे. मात्र, आता भारतीय इतिहासकार विजय प्रसाद यांनी हवामान बदलाचा दोष इतर देशांना देऊन लादले जात असलेल्या निर्बंधांवर सडकून टीका केलीय. तसेच अमेरिका-ब्रिटनची अक्षरशः शाळा घेतलीय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विजय प्रसाद म्हणाले, “ग्लास्गो हे ब्रिटनमधील दुसऱ्या क्रमांकाचं महत्त्वाचं शहर होतं. यात खूप सुंदर इमारती, चांगले रस्ते आणि अनेक सुविधा आहेत. मात्र, मी जेव्हा अशी शहरं पाहतो तेव्हा मला याची दुसरी बाजू दिसते. एक म्हण आहे प्रत्येक नागरी वसाहतीचं स्मारक हे त्या समाजातील क्रुरतेचंही स्मारक असतं. बंगालमध्ये ज्युट कामगार दांडीमार्गे ग्लास्गो बंदरावर माल पाठवायचे. आफ्रिकेतील नागरिकांना गुलाम करून घाणातून पाश्चिमात्य देशांमध्ये आणण्यात आलं. त्यांच्या कष्टातून सर्व नफ्याचं शोषण करून लंडन आणि ग्लास्गोसारख्या शहरात ओतला जायचा.”

“ब्रिटिशांनी १७६५-१९३८ या काळात भारताकडून ४५ ट्रिलियन पाऊंड लुटले”

“ब्रिटिशांनी १७६५-१९३८ या काळात भारताकडून ४५ ट्रिलियन पाऊंड लुटले. त्यासाठी आम्हाला कधीही मोबदला देण्यात आला नाही. जेव्हा ब्रिटिशांनी भारत सोडला देशाचा शिक्षणाचा दर १३ टक्के होता. या काळात आमच्या जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या. ब्रिटिशांनी भारतावर कोळसा लादला. ब्रिटिशांनीच भारताला कोळशावर परावलंबी केलं आणि आता तेच आम्हाला प्रश्न विचारत दोष देत आहेत,” असं विजय प्रसाद यांनी सांगितलं.

प्रसाद पुढे म्हणाले, “मी जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान बॉरिस जॉन्सन, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांना ऐकतो तेव्हा त्यांनी कसे उपकार केले हेच ऐकू येतं. यांनी ४०० वर्षांपासून आजपर्यंत उपकार केले असंच सांगत आहे. वसाहतवाद हा केवळ भूतकाळात झाला असं नाही. त्यांच्यासाठी वसाहतवाद ही कायमची अट आहे. वसाहतवादी मानसिकतेतून ही अट पूर्ण होते.”

“अमेरिका-ब्रिटनला केवळ सामूहिक जबाबदाऱ्या आवडतात”

“या देशांना आम्हाला उपदेश करायचे आहेत. सर्व प्रश्नांना आम्ही कारणीभूत आहोत हे त्यांना सांगायचं आहे. कारण या सर्वांचा दोष त्यांचाच आहे हे त्यांनी कधी मान्यच केलं नाही. यांनी १९९२ मध्ये रिओ धोरण स्विकारलं. त्यात त्यांच्यावर काही जबाबदाऱ्या टाकण्यात आल्या आणि काही जबाबदाऱ्या सामूहिकपणे ठरवण्यात आल्या. पण त्यांना केवळ सामूहिक जबाबदाऱ्या आवडतात. ते सांगतात आपण सोबत आहोत, पण सर्वजण सोबत नाहीत,” असंही विजय प्रसाद यांनी नमूद केलं.

“अमेरिकेच्या ४-५ टक्के लोकसंख्येकडून जगातील २५ टक्के संसाधनांचा वापर”

विजय प्रसाद म्हणाले, “अमेरिकेची ४-५ टक्के लोकसंख्या आजही जगातील २५ टक्के संसाधनांचा वापर करते. त्यांनी चीनमध्ये उत्पादन हलवलं. त्यानंतर सांगतात की चीन कार्बन उत्सर्जनाला कारणीभूत आहे. चीन अमेरिकेच्या बादल्या, नट-बोल्ट्स, फोन उत्पादित करत आहे. तुम्ही हे सर्व उत्पादन स्वतःच्या देशात करावं आणि मग बघावं किती कार्बन उत्सर्जन होतं. यांना आम्हाला उपदेश द्यायला आवडतं. कारण यांची मानसिकता वसाहतवादाची आहे.”

“अमेरिकेच्या व्यवस्थेतच वसाहतवाद आहे. प्रत्येकवेळी हे आम्हाला कर्ज देतात. खरंतर ते आमचेच पैसे आहेत. दरवेळी जागतिक नाणेनिधी (IMF) आम्हाला निधी देतात आणि ते पैसे देत आहेत असं सांगतात. पण नाही, ते आमचेच पैसे आहेत. तुम्ही परतावा म्हणून आमचे पैसे आम्हाला देत आहात. असं असतानाही ते आम्ही कसं राहावं असे उपदेश देतात. ही केवळ वसाहतवादी मानसिकता नाही, तर वसाहतवादी संस्था आहेत ज्या वर्षानुवर्षे वसाहतवाद निर्माण करत आहे,” असा आरोप प्रसाद यांनी केला.

विजय प्रसाद म्हणाले, “जागतिक हवामान बदल चळवळ या वसाहतवादाच्या मुद्द्यावर पुरेशी नाहीये. ही चळवळ आम्हाला भविष्याची काळजी आहे असं म्हणत आहे. मात्र, कोणतं भविष्य? अफ्रिका, आशिया, लॅटिन अमेरिकामधील मुलांना अजिबात भविष्य नाहीये. या मुलांना वर्तमानकाळच नाहीये, त्यामुळे त्यांना भविष्याची काळजी नाहीये. भविष्याची काळजी आहे ही पाश्चिमात्य मध्यमवर्गीय घोषणा आहे. तुम्हाला आत्ताची काळजी वाटली पाहिजे.”

हेही वाचा : पुढील ७९ वर्षात असं काही घडणार की…; जागतिक तापमान वाढीसंदर्भात धोक्याचा इशारा

“जगातील २७० कोटी लोकांना खायला अन्न मिळत नाही आणि तुम्ही लोकांना सांगता वापर कमी करा. ज्या मुलाने अनेक दिवसांपासून जेवण केलं नाही त्याला हे सांगणं कसं वाटेल? अन्यथा या चळवळीला तिसऱ्या जगात काहीही भविष्य नसेल. जगात २०० राजकीय पक्षांची संघटना आहे. जगाच्या दक्षिणेत या संघटनेचं काम चालतं. आम्हाला तुम्हाला आमचे प्रश्न काय आहेत हे सांगायचं आहे. पण तुम्हाला ते ऐकायचं आहे का?” असा सवाल प्रसाद यांनी केला.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian historian vijay prasad criticize america uk over climate change global warming pbs
First published on: 30-11-2021 at 15:47 IST