बुधवारी देशातील दुसरी सर्वात मोठी आयटी कंपनी असणाऱ्या इन्फोसिसने रशियामधील व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतलाय. युक्रेनविरोधात रशियाने युद्ध पुकारल्यानंतर जगभरामधील अनेक बड्या कंपन्यांनी रशियामधून काढता पाय घेतला असून आता त्यात इन्फोसिसचाही समावेश झालाय. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियामधून मागील दीड महिन्यांमध्ये अनेक कंपन्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये वाहन क्षेत्रातील कंपन्यांबरोबरच माहिती तंत्रज्ञान म्हणजेच आयटी क्षेत्रातील कंपन्यांचाही समावेश आहे.

रशियाने २४ फेब्रुवारी रोजी युक्रेनवर हल्ला चढवला. त्यानंतर शेकडो परदेशी कंपन्यांनी या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी आपला रशियामधील उद्योग पूर्णपणे बंद करुन गाशा गुंडाळला. गुंतवणूकदार आणि ग्राहकांकडून असणाऱ्या दबावामुळे पाश्चिमात्य देशांमधील अनेक कंपन्या रशियामधून बाहेर पडल्या.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सॅप आणि ओरॅकल या दोन मोठ्या कंपन्यांनी रशियामधील व्यवसाय बंद केलाय. युक्रेनचे उपराष्ट्राध्यक्ष मखायलो फेड्रोव्ह यांनी या कंपन्याकडे विनंती केल्यानंतर कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. युक्रेनच्या उप पंतप्रधानांनी या दोन्ही कंपन्यांना लिहिलेली पत्र ट्विटरवरुन पोस्ट केली होती.

रशियामधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणाऱ्या इन्फोसिसने यासंदर्भात खुलासा करताना, युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कंपनी इतर पर्यायांचा शोध घेत आहे, असं सांगितलं. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी, “आम्हाला आजच्या घडीला रशियन क्लायंटसोबत कोणत्याच डील्स करायच्या नाहीयत. तसेच पुढेही त्यांच्यासोबत व्यापार करण्याचा आमचा विचार नाहीय,” असं स्पष्ट केलंय. इन्फोसिसची स्थापना १९८१ रोजी सात जणांनी केली होती. त्यामध्ये नारायण मुर्तींचाही समावेश होता.

देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने बुधवारी टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे. बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या इन्फोसिसने गेल्या वर्षी याच काळात ५,०७६ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदविला होता. मात्र गेल्या तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ५,८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाहीत ३२,२७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे, मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ तिमाहीशी तुलना करता त्यात एक टक्क्याची घसरण झाली आहे. या तिमाहीत ३१,८६७ कोटींच्या महसुलाची कंपनीने नोंद केली होती. तर जानेवारी-मार्च २०२१ तिमाहीत कंपनीने २६,३११ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळविला होता.

सरलेल्या २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत इन्फोसिसने २२,११० कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक राहिला आहे. एप्रिल-मार्च २०२१ या कालावधीत कंपनीने वर्षभरात १९,३५१ कोटींचा नफा मिळविला होता. तर महसुलाच्या आघाडीवर २१ टक्क्यांची वाढ नोंदवत १,२१,६४१ कोटी रुपयांची महसूल प्राप्ती केली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,००,४७२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता. कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना खूश करताना, पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी १६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

ग्राहकांकडून मोठय़ा, दीर्घ मुदतीचे करार करण्यापेक्षा अल्प कालावधीचे करार करण्याला अधिक प्राधान्य दिले जात आहे. सतत होणाऱ्या डिजिटल परिवर्तनामुळे प्रकल्प राबविण्याच्या त्यांच्या गरजेनुरूप ग्राहक अल्प कालावधीच्या कराराला प्राधान्य देत असले तरी कंपनीने सरलेल्या तिमाहीत स्थिर कामगिरी केली आहे, असेही पारेख यांनी सांगितलं.