Indian and Pakistani nationals killed in Abu Dhabi : अबु धाबीमध्ये गुरुवारी क्षेपणास्त्र रोखल्यानंतर पडलेल्या अवशेषांमुळे (debris) झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. या घटनेत अन्य एक भारतीय आणि एक जॉर्डनचा नागरिक जखमी झाले असून ते थोडक्यात बचावले आहेत.
जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, या दुर्घटनेत भारतीय नागरिकासह पाकिस्तनाच्या नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. जॉर्डनने या घटनेचा तीव्र निषेध केला असून, याला ‘इराणी हल्ला’ म्हटले आहे. स्थानिक प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, ही दुःखद घटना अबु धाबीतील ‘स्वीहान स्ट्रीट’ (Sweihan street) येथे घडली.
अबु धाबी मीडिया ऑफिसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “वायु संरक्षण प्रणालीद्वारे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र यशस्वीरित्या रोखल्यानंतर स्वीहान स्ट्रीटवर पडलेल्या अवशेषांमुळे उद्भवलेल्या परिस्थितीला प्रशासनाने त्वरित प्रतिसाद दिला आहे.” इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध सुरू झाल्यापासून संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) ऊर्जा पायाभूत सुविधांसह अनेक ठिकाणांना इराणी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी लक्ष्य केले आहे.
UAE मध्ये ११ मृत्यूंची नोंद
‘गल्फ न्यूज’च्या वृत्तानुसार, युएईमध्ये आतापर्यंत या युद्धाशी संबंधित ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. यापूर्वी नोंदवलेल्या नऊ मृत्यूंमध्ये युएई सशस्त्र दलाच्या तीन सदस्यांचा समावेश होता. युएईच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, आतापर्यंत पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश आणि पॅलेस्टाईनच्या सहा नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. बुधवारी मंत्रालयाने माहिती दिली की, “इराणच्या आक्रमकतेच्या सुरुवातीपासून, युएईच्या वायु संरक्षण दलाने ३५७ बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे, १५ क्रूझ क्षेपणास्त्रे आणि १,८१५ यूएव्ही (ड्रोन) नष्ट केले आहेत.”
या संपूर्ण काळात एकूण १६६ लोक जखमी झाले असून, त्यांच्या जखमांचे स्वरूप किरकोळ ते गंभीर आहे. जखमींमध्ये युएई, भारत, पाकिस्तान, इजिप्त, सुदान, इथिओपिया, फिलीपिन्स, बांगलादेश, श्रीलंका, ओमान, जॉर्डन आणि स्वीडनसह अनेक देशांच्या नागरिकांचा समावेश असल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
