वृत्तसंस्था, नवी दिल्ली

स्वयंपाकाच्या गॅसची (एलपीजी) वाहतूक करणारी दोन भारतीय जहाजांनी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली असल्याची माहिती जहाजबांधणी मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने शनिवारी दिली. जहाजबांधणी मंत्रालयाचे विशेष सचिव राजेश कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की शिवालिक आणि नंदादेवी या तिरंगा लावलेल्या जहाजांनी शनिवारी सकाळी होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडली आहेत.

शिवालिक सोमवारी गुजरातच्या मुंद्रा बंदरात पोहोचण्याची शक्यता असून दुसऱ्या दिवशी नंदादेवी जहाज कांडला बंदरांत पोहोचेल, अशी अपेक्षा असल्याची माहिती सिन्हा यांनी दिली. या जहाजांमध्ये ९२ हजार ७०० टन एलपीजी आहे. युद्ध सुरू झाल्यापासून सामुद्रधुनीच्या पश्चिमेला भारताची २४ जहाज अडकून पडली होती, उरलेल्या २२ जहाजांच्या सुरक्षित प्रवासासाठी चर्चा सुरू असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी दिली. या २२ जहाजांवर एकूण ६११ नाविक असल्याचे सांगण्यात आले.

भारताच्या जहाजांना परवानगी

भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली जाईल, असे इराणच्या सर्वोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी शनिवारी ‘एएनआय’ वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले. ‘एएनआय’ला दिलेल्या मुलाखतीत इलाही म्हणाले की, “हो, अर्थातच अशी परवानगी दिली जाईल. मी असे ऐकले आहे की, आमच्या दूतावासाने काही भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची संधी देण्याचा प्रयत्न केला आहे.”