फ्रान्सच्या राजधानी पॅरिसमध्ये भारतीय नागरिक रोहन राणे (वय २९) याच्यावर गंभीर आरोपांप्रकरणी खटला सुरु झाला आहे. राणेने ‘सीव्हीएलटी’ नावाचे निओ-नाझी आणि अतिरेकी ऑनलाइन नेटवर्क चालवल्याचा आणि अल्पवयीन मुलींना ऑनलाईन लैंगिक कृत्ये तसेच स्वतःला इजा करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. दोष सिद्ध झाल्यास त्याला जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याबद्दल सविस्तर वृत्त इंडिया टुडेने दिले आहे.
‘डिस्कॉर्ड’वर मुलींना ब्लॅकमेल केल्याचा आरोप
फ्रेंच तपास यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, ‘सीव्हीएलटी’ गटामधील सदस्य ‘डिस्कॉर्ड’सारख्या प्लॅटफॉर्मवरून असुरक्षित आणि अल्पवयीन मुलींना लक्ष्य करत होते. मुलींकडून खासगी फोटो किंवा व्हिडीओ मिळवल्यानंतर त्यांचा वापर करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. तपासात राणेशी संबंधित सुमारे २० पीडितांची ओळख पटली असून त्यांचे वय १२ ते १८ वर्षांदरम्यान होते, अशी माहिती ‘ले मोंडे’ने दिली आहे. या प्रकरणाच्या व्यापक तपासात अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, डेन्मार्क, एस्टोनिया आणि नेदरलँड्ससह विविध देशांतील सुमारे १०० पीडितांची ओळख पटल्याचेही वृत्त आहे.
२०२० मध्ये प्रकरण समोर आले
या प्रकरणाची सुरुवात २०२० मध्ये झाली. अमेरिकेतील ‘नॅशनल सेंटर फॉर मिसिंग अँड एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन’कडे अल्पवयीन मुलींशी संबंधित संशयास्पद ऑनलाइन गोष्टीची माहिती आल्यानंतर आंतरराष्ट्रीय तपास सुरू झाला. त्यानंतर फ्रान्स, अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील यंत्रणांनी मिळून तपास केला.
राणे फ्रान्समध्ये बिझनेसचे शिक्षण घेण्यासाठी गेला होता. त्यानंतर त्याने फिटनेस कोच म्हणूनही काम केले. तपास यंत्रणांच्या मते, तो ‘सीव्हीहीएलटी’ गटाच्या प्रमुख व्यक्तींपैकी एक होता आणि ‘डिस्कॉर्ड’वरील गटाचे व्यवस्थापन करत होता.
जन्मठेपेची शक्यता का निर्माण झाली?
राणेविरोधात अल्पवयीन मुलांवरील अत्याचार, बाल लैंगिक शोषणाशी संबंधित सामग्रीचा प्रसार आणि संघटित खंडणीसह अनेक गंभीर आरोप आहेत. सुरुवातीला त्याला २० वर्षांपर्यंतच्या शिक्षेचा सामना करावा लागू शकत होता. मात्र, २०२५ मध्ये या प्रकरणात ‘छळ किंवा अमानुष कृत्यांसह केलेली खंडणी’ हा आरोप विचारात घेण्यात आला. त्यामुळे दोष सिद्ध झाल्यास जन्मठेपेची शिक्षा होण्याचा मार्ग मोकळा झाला. राणेची वकील इरिना क्रात्झ यांनी या अतिरिक्त आरोपाला कायदेशीर आधार नसल्याचा दावा केला आहे.
खटला बंद दाराआड
पीडित आणि साक्षीदारांच्या सुरक्षेचा विचार करून पॅरिस न्यायालयाने खटल्याची सुनावणी बंद दाराआड घेण्याचे आदेश दिले आहेत. पीडितांच्या वतीने काम करणाऱ्या वकिलांनी याला विरोध केला होता. पाच अमेरिकन महिला या प्रकरणात ‘सिव्हिल पार्टी’ म्हणून सहभागी झाल्या असून, त्यापैकी काही जणी व्हिडीओ लिंकद्वारे साक्ष देण्याची शक्यता आहे. हा खटला शुक्रवारपर्यंत सुरू राहणार आहे.
