दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी राजविंदर सिंग नावाच्या ३८ वर्षीय इसमाला अटक केली आहे. ऑस्ट्रेलियामधील एका तरुणीच्या हत्या प्रकरणामध्ये प्रमुख आरोपी असलेल्या राजविंदरला पकडून देणाऱ्याला पाच कोटींचं बक्षीस ऑस्ट्रेलियामध्ये जाहीर करण्यात आलं होतं. ऑस्ट्रेलियातील हा ‘मोस्ट वॉन्टेड’ आरोपी दिल्ली पोलिसांच्या हाती लागला आहे. क्विन्सलॅण्डच्या सुमद्रकिनाऱ्यावर २०१८ साली एका २४ वर्षीय तरुणीची हत्या केल्यानंतर राजविंदर भारतात पळून आला होता. हत्या केल्यानंतर दोन दिवसांमध्येच तो भारतात परतला होता. मागील चार वर्षांपासून ऑस्ट्रेलियन पोलीस त्याचा शोध घेत होते. अखेर दिल्ली पोलिसांच्या मदतीने आरोपीला पकडण्यात यश आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरोपी राजविंदरने तोह्या कॉर्डिंगले नावाच्या २४ वर्षीय तरुणीचा २१ ऑक्टोबर २०१८ रोजी खून केला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मृत तोह्या क्विन्सलॅण्डमधील वँगेटी समुद्रकिनाऱ्यावर आपल्या कुत्र्याबरोबर फेरफटका मारण्यासाठी आली होती. दरम्यान, आरोपी राजविंदर आपल्या पत्नीशी वाद घालून वँगेटी समुद्रकिनाऱ्यावर आला होता. यावेळी त्याने आपल्याबरोबर काही फळं आणि स्वयंपाकघरातील चाकू आणला होता.

दरम्यान, ऑस्ट्रेलियन तरुणी तोह्याचा कुत्रा भुंकल्याने तोह्या आणि राजविंदर यांच्यात वाद झाला. सुरुवातीला बाचाबाची झाल्यानंतर राजविंदरने रागाच्या भरात तोह्यावर चाकुने हल्ला केला. या हल्ल्यात तोह्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीनं मृत तोह्याचा मृतदेह समुद्रकिनारी रेतीमध्ये पुरला आणि घटनास्थळावरून पळ काढला. खूनाच्या घटनेनंतर दोन दिवसांनी आरोपी राजविंदरने आपली नोकरी, पत्नी आणि तीन मुलांना ऑस्ट्रेलियात सोडून भारतात पळून आला. तेव्हापासून ऑस्ट्रेलियन पोलीस त्याचा शोध घेत होते.

तीन आठवड्यांपूर्वी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी राजविंदरला शोधून देणाऱ्यास एक मिलियन ऑस्ट्रेलियन डॉलर्सचं (म्हणजेच जवळजवळ ५ कोटी ३० लाख रुपयांचं) बक्षीस जाहीर केलं. कोणत्याही आरोपीसाठी क्विन्सलॅण्ड पोलिसांनी जाहीर केलेल्या बक्षिसांपैकी हे सर्वात मोठं बक्षीस ठरलं. राजविंदर हा मुळचा पंजाबमधील अमृतसर येथील बट्टर कालन येथील रहिवाशी आहे. “आम्हाला इतकं ठाऊक आहे की कॅरेन्समधून राजविंदरने २२ ऑक्टोबर रोजी उड्डाण केलं. म्हणजेच तोह्याच्या हत्येच्या दुसऱ्या दिवशीच तो सिडनीला गेला. त्यानंतर २३ तारखेला तो सिडनीवरुन भारताला रवाना झाला. तो भारतात दाखल झाल्याची पक्की माहिती आमच्याकडे आहे,” असं क्विन्सलॅण्ड पोलिसांनी ३ नोव्हेंबर रोजी पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं.

हेही वाचा- ५ कोटी ३० लाखांचं बक्षिस असलेल्या आरोपीला दिल्लीत अटक; २४ वर्षीय तरुणीची हत्या करुन पत्नी, मुलांना ऑस्ट्रेलियात सोडून काढलेला पळ

भारत सरकारने यापूर्वीच राजविंदरला ऑस्ट्रेलियन तपास यंत्रणांच्या ताब्यात देण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. ऑस्ट्रेलियन पोलिसांकडे राजविंदरसंदर्भात ठोस पुरावे असून या पुराव्यांच्या आधारेच आता त्याला ऑस्ट्रेलियन पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian man killed australian young woman on beach after barking her dog delhi rajwinder singh rmm
First published on: 27-11-2022 at 18:52 IST