Indian Man भारतातल्या एका नागरिकाने व्हिसा इंटरव्ह्यूमध्य दिलेल्या प्रामाणिक उत्तराचं फळ त्याला मिळालं आणि व्हिसा ४० सेकंदात नाकारला गेला असं म्हटलं आहे. माझं अमेरिकेत जाण्याचं स्वप्न ४० सेकंदांत भंगल्याचंही तो म्हणाला आहे. B1/ B2 व्हिसासाठी त्याने अर्ज केला होता. आपल्याला व्हिसा मंजूर होईल असं वाटलं होतं पण तसं झालं नाही. यानंतर या माणसाने nobody01810 या नावाने रेडइटवर एक पोस्ट लिहिली आहे. नवी दिल्लीतील अमेरिकन दुतावासात व्हिसा मुलाखती दरम्यान आलेला अनुभव त्याने सांगितला आहे.

काय म्हटलं आहे या माणसाने?

“मी B1/B2 व्हिसा इंटरव्ह्यूसाठी दिल्लीतल्या अमेरिकन दुतावासात पोहचलो. त्यानंतर मला अवघ्या ४० सेकंदात तीन प्रश्न विचारुन व्हिसा नाकारण्यात आला. मला हेदेखील कळलं नाही की माझं नेमकं काय चुकलं? मला चूक समजली असती तर मी ती पुढच्या वेळी सुधारेन. असं या माणसाने रेड इटवर म्हटलं आहे.

माझं नेमकं काय चुकलं?

रेडइटवर या माणसाने लिहिलेल्या पोस्टप्रमाणे त्याने दोन आठवड्यांसाठी फ्लोरिडाला जायचं ठरवलं होतं. डिस्नेवर्ल्ड, युनिव्हर्सल स्टुडिओ, केनेडी स्पेस सेंटर आणि इतर गोष्टी बघायच्या असा निर्णय त्याने घेतला होता. अमेरिकेत जाता यावं म्हणून हा माणूस व्हिसा इंटरव्ह्यूसाठी गेला. त्यावेळी त्याला तीन प्रश्न विचारण्यात आले. तुला अमेरिकेला का जायचं आहे? तू याआधी भारताबाहेर प्रवास केला आहेस का? आणि अमेरिकेत तुझ्या कुटुंबापैकी किंवा मित्रांपैकी कुणी राहतं का? या सगळ्याबाबत मी प्रामाणिकपणे उत्तरं दिली. मी त्यांना सांगितलं की मला फ्लोरिडाला सुट्टीसाठी जायचं आहे. याआधी आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. तसंच फ्लोरिडामध्ये माझी गर्लफ्रेंड राहते. दुतावासातल्या अधिकाऱ्याला माझा प्रामाणिकपणा आवडला नाही. त्याने मला अवघ्या ४० सेकंदात सांगितलं की तुला व्हिसा नाकारण्यात येतो आहे. त्याने मला व्हिसा नाकारल्याची पावतीच माझ्या हातात ठेवली. त्यानंतर माझं अमेरिकेला जाण्याचं स्वप्न भंगलं. मी फ्लोरिडा या ठिकाणी फिरायला जाणार होतो, माझ्या गर्लफ्रेंडसह चांगला वेळ घालवणार होतो. त्यासाठी मी दोन आठवडे सुट्टी घेतली होती. पण हे काहीही होऊ शकलं नाही. शिवाय माझं नेमकं काय चुकलं हेदेखील मला समजलं नाही असं या माणसाने म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रामाणिकपणे उत्तरं देणं ही माझी चूक आहे?

मी प्रामाणिकपणे तिन्ही प्रश्नांची उत्तरं दिली ही माझी चूक आहे का? माझ्या प्रामाणिकपणाचं हे फळ मला का मिळालं? मला विचारण्यात आलेल्या तिन्ही प्रश्नांची काही वेगळी उत्तरं देणं अपेक्षित होतं का? मला इतक्या तातडीने व्हिसा का नाकारण्यात आला? मी गर्लफ्रेंडसह फिरायला जाणार आहे ती तिकडे राहते हा उल्लेख मी टाळायला हवा होता का? अशा प्रश्नांची उत्तरं देण्याआधी काय तयारी करायची? असे प्रश्न या माणसाने त्याच्या पोस्टमध्ये विचारत खंत व्यक्त केली आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.