Indian man shoots wife and 3 relatives in US : अमेरिकेतील जॉर्जिया राज्यात कथित कौटुंबिक वादातून झालेल्या गोळीबाराच्या घटनेत बळी पडलेल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश असल्याची माहिती अटलांटा येथील भारतीय दूतावासाने दिली आहे. शुक्रवारी पहाटे झालेल्या या गोळीबारात चार जणांचा समावेश असून संशयीत आरोपीने पत्नीसह इतर तीन नातेवाईकांची गोळ्या घालून हत्या केली आहे. गंभीर बाब म्हणजे, ही घटना घडली तेव्हा तीन मुले देखील घरात उपस्थित होती, असे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे.
अटलांटा येथील भारत सरकारच्या वाणिज्य दूतावासाने या गोळीबाराच्या घटनेनंतर शोक व्यक्त केला आहे. तसेच संशयित हल्लेखोराला अटक करण्यात आली असून शोकाकुल कुटुंबाला आवश्यक असलेली सर्व मदत केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
“एका कथित कौटुंबिक वादाशी संबंधित गोळीबाराच्या घटनेमुळे, ज्यामधील बळी पडलेल्यांमध्ये एका भारतीय नागरिकाचा समावेश होता, आम्हाला खूप दु:ख झाले आहे. कथित हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे आणि शोकाकुल कुटुंबाला सर्व मदत केली जात आहे,” असे एक्सवर म्हटले आहे.
Fox5 अटलांटाने दिलेल्या वृत्तानुसार संशयिताचे नाव विजय कुमार (५१) असे असून तो अटलांटाचा रहिवासी आहे. तर Gwinnett काउंटी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीमू डोग्रा (वय ४३), गौरव कुमार (वय ३३), निधी चंदर (वय ३७) आणि हरीश चंदर (वय ३८) अशी या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
स्थानिक वेळेनुसार शुक्रवारी पहाटे २.३० च्या सुमारास ब्रूक आयव्ही कोर्ट १००० ब्लॉक परिसरातून आलेल्या फोननंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तिथे त्यांना घराच्या आत चार प्रौढ व्यक्तींचे मृतदेह आढळले. या सर्वांचा गोळी लागल्याने मृत्यू झाला होता, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, गोळीबार सुरू झाला तेव्हा मुले घटनास्थळी उपस्थित होती. स्वत:ला वाचवण्यासाठी ही मुले घरातील कपाटामध्ये जाऊन लपली होती.
या मुलांपैकी एकाने ९११ क्रमांकावर फोन केला, आणि घडलेल्या प्रकाराबाबत माहिती दिली ज्यामुळे अवघ्या काही मिनिटांमध्ये पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले, असे तपासकर्त्यांनी सांगितले. मुलांना कुठलीही दुखापत झालेली नाही आणि त्यांना कुटुंबातील सदस्यांना सोपवण्यात आले आहे.
