Streamer Slapped By Indian Man Live Stream : व्हायरल व्हिडीओमध्ये स्ट्रीमर स्टोअरमध्ये एका भारतीय व्यक्तीकडे कॅमेरा रोखून त्याचे चित्रीकरण करताना दिसतो. संबंधित व्यक्तीने आपला व्हिडीओ शूट करू नये, अशी वारंवार विनंती केली. मात्र, स्ट्रीमरने त्याच्याशी बोलणे आणि रेकॉर्डिंग सुरूच ठेवले. दोघांमध्ये याच मुद्द्यावरून शाब्दिक वाद वाढला. स्ट्रीमरकडून परिस्थितीबाबत काही दावे करण्यात आले, ज्याला समोरच्या व्यक्तीने आक्षेप घेतला. त्यानंतर वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. याबद्दल सविस्तर वृत्त दी इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.
कॅमेरा बंद करण्यास सांगूनही रेकॉर्डिंग सुरू
‘ली’ या युट्युबरने शेअर केलेल्या एका व्हिडिओनुसार, तो एका दुकानातून लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना त्याने कॅमेरा तिथल्या दोन भारतीय तरुणांकडे वळवला. “तुम्ही भारताच्या कोणत्या भागातून आला आहात? दिल्लीतून का?” असा प्रश्न लीने त्यांना विचारला, त्यावर त्या तरुणांनी आपण बेंगळुरूमधून असल्याचे उत्तर दिले.
व्हिडीओमध्ये संबंधित व्यक्ती स्ट्रीमरला कॅमेरा आपल्यापासून दूर ठेवण्यास सांगताना दिसतो. मात्र, स्ट्रीमरने संवाद सुरूच ठेवल्याने वाद वाढत गेला. काही वेळाने भारतीय व्यक्ती स्ट्रीमरच्या दिशेने चालत जातो आणि कॅमेरा सुरू असतानाच त्याच्या कानशिलात लगावतो. त्यानंतरचा हा प्रसंग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
सोशल मीडियावर स्ट्रीमरवरही टीका
या घटनेनंतर सोशल मीडिया युजर्समध्ये लाईव्ह स्ट्रीम करताना अनोळखी व्यक्तींचे परवानगीशिवाय चित्रीकरण करणे योग्य आहे का, यावर चर्चा सुरू झाली आहे. काही युजर्सनी स्ट्रीमरने समोरच्या व्यक्तीची वारंवार विनंती दुर्लक्षित केल्याची टीका केली. काहींनी स्ट्रीमरवर कथित वर्णद्वेषी वक्तव्ये केल्याचाही आरोप केला आहे. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही.
एका युजरने लिहिले की, संबंधित व्यक्ती अनेकदा कॅमेरा आपल्या चेहऱ्यासमोर ठेवू नका, असे सांगत असतानाही स्ट्रीमरने रेकॉर्डिंग सुरू ठेवले. दुसऱ्या युजरनेही स्ट्रीमरने समोरच्या व्यक्तीचे म्हणणे ऐकायला हवे होते, अशी प्रतिक्रिया दिली. या घटनेमुळे लाइव्ह स्ट्रीमिंग करताना इतरांच्या गोपनीयतेचा आणि संमतीचा आदर करण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.
