Indian man stabbed USA: अमेरिकेतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुस्लिम असल्याच्या कारणावरुन भारतीय व्यक्तीवर चाकू हल्ला झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ४८ वर्षीय पीटर मायकल लार्सेन या व्यक्तीने भारतीय व्यक्तीवर तो मुस्लिम असल्याचा कारणावरुन वार केले. या व्यक्तीचा मुस्लिम लोकांना ठार करण्याचा मानस असल्याचे देखील त्याने बोलून दाखवले. पश्चिम व्हॅली सिटीत व्हॅली फेअर मॉलमध्ये सोमवारी ही घटना घडली.
हल्लेखोराला अटक
चाकू हल्ला केल्याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी ४८ वर्षीय पीटर मायकल लार्सेन याला अटक केली आहे. त्याच्याविरोधात खूनाचा प्रयत्न आणि प्राणघातक शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पीटर मायकल लार्सेन सॉल्ट लेक कंट्री तुरुंगात असल्याची माहिती समोर आली आहे. चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव सोहेल असून, तो व्हॅली फेअर मॉलमध्ये कामाला आहे.
मुस्लिम असल्याच्या कारणावरुन हल्ला
एबीसीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोर पीटरने सोहेलला तो कोणत्या देशाचा रहिवासी आहे? याबाबत प्रश्न विचारला. यावर त्याने, “मी भारतीय असून, माझे नाव सोहेल आहे”, असे उत्तर दिले. “तू मुस्लिम आहेस का?”, असा पुढे प्रश्न विचारला असता सोहेल “हो” म्हणाला आणि हल्लेखोराने चाकूने वार करण्यास सुरुवात केली. प्रदक्षदर्शींनी सॉल्ट लेक ट्रिब्युनला दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोर पीटरने सोहेलकडे पाण्याची बॉटल आहे का? असे देखील विचारले होते. सोहेल बॉटल घेण्यासाठी झुकला असता हल्लेखोराने त्याच्यावर वार केले, असे वृत्तात म्हटले आहे.
१५ वार
सोहेलवर १५ वेळा वार करण्यात आले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर विविध शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सॉल्ट लेक ट्रिब्युनच्या वृत्तात म्हटले आहे. समोर आलेल्या अधिकच्या माहितीनुसार, हल्लेखोर पीटरला रोखण्यासाठी काही प्रत्यक्षदर्शींनी धाव घेतली व अधिक वार करण्यापासून रोखले. अशा घटना धक्कादायक असल्याचे मत स्थानिकांनी नोंदवले आहे. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पीटरला अटक केली.
सोहेल कष्टाळू असल्याचे सहकाऱ्यांचे मत
हल्ल्यात जखमी झालेला सोहेल कष्टाळू कर्मचारी असल्याचे मत अनेकांनी नोंदवले आहे. हसतमुख, कष्टाळू असणारा व्यक्ती. मी त्याचे मॅनेजर पदावर प्रमोशन केले होते. तुम्ही एखाद्या व्यक्तीचा खून करता त्यावेळी तुम्ही केवळ एका व्यक्तीला मारत नाही, अख्या कुटुंबाचा खून करता, असे सोहेलचे मॅनेजर अदनान मोहम्मद म्हणाले.
