How an Indian medical student executed an AI influencer scam targeting Trump supporters: डॉक्टर होणं हे भारतात अनेकांचे स्वप्न असते. पण भारतात वैद्यकीय शिक्षण प्रचंड महाग आहे. शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी काही विद्यार्थी शिक्षण घेतानाच नोकरी करतात. मात्र एका विद्यार्थ्याने सोप्या मार्गाने जास्त पैसे कमविण्यासाठी एआयचा वापर केला. सॅम (नाव बदलण्यात आले आहे) या विद्यार्थ्याने इमिली हार्ट नावाची इन्फ्लुएन्सर तयार केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या पुराणमतवादी विचारसरणीवर आधारित प्रोफाइल तयार करून सॅमने अनेक अमेरिकन रिपब्लिकन्सची लूट केली.
अमेरिकेतील वृत्तसंस्था वायर्डने याबाबतचे सविस्तर वृत्त दिले आहे. २२ वर्षीय विद्यार्थ्याने उजव्या विचारसरणीवर भाष्य करणाऱ्या एआय इन्फ्लुएन्सरच्या प्रोफाइलच्या आधारावर हजारो डॉलर्स कमावले. ट्रम्प यांच्या ‘मागा’ (Make America great again) या विचारसरणीला एमिली हार्टच्या हँडलवरून प्रसिद्धी दिल्यामुळे अनेक ‘मागा’ कार्यकर्ते एमिली हार्टच्या प्रोफाइलशी जोडले गेले होते.
एआय इन्फ्लुएन्सर बनविण्याची कल्पना कशी सुचली
वायर्डशी बोलताना सॅमने एमिली हार्टच्या प्रोफाइलमागची पूर्ण कथा सांगितली. तो म्हणाला की, त्याच्या शिक्षणासाठी पालकांकडून मिळणारे पैसे अपुरे पडत होते. यासाठी त्याने हा मार्ग निवडला. दरम्यान एआय मॉडेल तयार करण्याआधी सॅमने युट्यूब शॉर्ट्स आणि वैद्यकीय शिक्षणाच्या नोट्स बनवून विकण्याचा प्रयत्न केला. पण त्याला हवे तेवढे पैसे मिळू शकले नाहीत.

मग सॅमच्या डोक्यात एआय मॉडेल तयार करून तिचे बिकिनीमधील फोटो विकण्याची कल्पना आली. सुरुवातीला सॅमने जेमिनीचे नॅनो बनाना प्रो वापरून महिलांचे कमी कपड्यातील फोटो तयार केले आणि ते इन्स्टाग्रामवर पोस्ट केले. पण सॅमची ही कल्पना यशस्वी झाली नाही.
यानंतर सॅमने एआय चॅटबॉटची मदत घेतली. सॅमने तयार केलेली मॉडेल लाखो इतर स्पर्धक एआय मॉडेलप्रमाणे दिसत असल्यामुळे तिला खूप स्पर्धा असल्याचे एआय चॅटबॉटने सांगितले. जर तुम्ही बोल्ड अवतारातील मॉडेल तयार केली तर तिला इतर लाखो मॉडेल्सशी स्पर्धा करावी लागेल, असे जेमिनीने सॅमला सांगितले.
चीट कोड आणि एमिली हार्टचा जन्म
सॅमने दिलेल्या पर्यायांपैकी जेमिनीने त्याला मागा/उजव्या विचारसरणीच्या गटाला लक्ष्य करण्यास सांगितले. जेमिनीने त्याला पुढे असेही सांगितले की, पुराणमतवादी विचारसरणीच्या (जे वयाने मोठे आहेत) लोकांकडे खर्च करण्यासाठी बऱ्यापैकी पैसे आहेत आणि ते विचारसरणीशी प्रामाणिक आहेत.
पुराणमतवादी विचारसरणीचा अभ्यास
अमेरिकेत कधीही न गेलेल्या सॅमने यानंतर मागा विचारसरणीचा अभ्यास करण्यास सुरुवात केली. यासाठी तो दररोज ख्रिश्चन समर्थक, दुसऱ्या घटनादुरुस्तीचे समर्थन, आयुष्याबद्दल सकारात्मक, गर्भपात विरोधी, वोक विरोधी आणि स्थलांतरितांच्या विरोधात लिखाण करू लागला, अशी माहिती त्याने वायर्डला दिली.

इन्स्टाग्रामवर एमिली हार्टचे पदार्पण
जानेवारी महिन्यात सॅमने एमिली हार्ट नावाचे एआय आधारित काल्पनिक पात्र तयार केले. हॉलिवूडची अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स आणि सिडनी स्वीनी यांच्याशी थोडेफार साम्य असलेली ही मॉडेल नर्स असल्याचे सॅमने दाखवले. एमिली हार्ट नर्स या नावाने इन्स्टाग्रामवर अकाऊंट तयार केल्यानंतर तिचे एआयवर तयार केलेले फोटो पोस्ट करण्यात आले. बर्फातील मासेमारी, रायफल शुटिंग असे ‘मागा’ कार्यकर्त्यांना आकर्षित करणारे फोटो सॅमने तयार करून पोस्ट केले.
या फोटोंना चटकन प्रसिद्धी मिळावी यासाठी सॅमने कुतूहल चाळवणारे कॅप्शनही लिहिले होते. जसे की, “तुम्हाला जर अनफॉलो करण्याचे कारण हवे असेल तर, ख्रिस्त राजा आहे, गर्भपात हा खून आहे आणि सर्व अवैध स्थलांतरितांना हद्दपार केले पाहिजे.” आणखी एका पोस्टमध्ये लिहिले, “तुम्हाला जन्माने बुद्धिमान अशी ओळख मिळाली, पण तुम्ही स्वतःला उदारमतवादी म्हणवून घेता.”
रील्सना लाखो व्ह्यूज
वायर्डशी बोलताना सॅम म्हणाला की, ही कल्पना जोरात चालली. माझ्या प्रत्येक रिलला तीन, पाच आणि १० दशलक्षापर्यंत व्ह्यूज मिळू लागल्या. इन्स्टाग्रामच्या अल्गोरिदमलाही बहुतेक माझी कल्पना आवडली. अवघ्या काही दिवसात एमिलीचे १० हजाराहून अधिक फॉलोअर्स झाले.
रिपब्लिकन्सना मूर्ख बनवत हजारो डॉलर्सची कमाई
सॅमने पुढे सांगितले की, इन्स्टाग्रामवरील फॉलोअर्सना त्याने इतर सबस्क्रिप्शन बेस्ड प्लॅटफॉर्मवर वळवले. जिथे एक्सक्लुजिव्ह एआय कंटेट विकला जात होता. तसेच मागा थिमवर आधारित वस्तूंचीही विक्री त्याने केली. PTSD: ‘मूर्ख डेमोक्रॅट्सचा कंटाळा आला आहे’, असे वाक्य लिहिलेल्या त्याच्या वस्तूंचीही विक्री झाली.
सॅमने म्हटले की, एमिली हार्टच्या मदतीने त्याने हजारो डॉलर्स कमवले. “मी रोज ३० ते ५० मिनिटे कंटेट बनविण्यासाठी घालवत होतो. वैद्यकीय विद्यार्थी म्हणून मी बऱ्यापैकी पैसे कमवत होतो. भारतासारख्या देशात नोकरी करूनही इतके पैसे कमवता येत नाहीत. यापेक्षा सोपा मार्ग मला तरी दुसरा दिसला नाही”, अशी कबुलीच सॅमने दिली.

डेमोक्रॅट्सची मॉडेल अपयशी ठरली
रिपब्लिकन्सप्रमाणेच डेमोक्रॅट्सना जाळ्यात ओढण्यासाठी सॅमने विरोधी विचारांचीही एक मॉडेल तयार केली होती. मात्र उदारमतवादी लोक तिला भुलले नाहीत. सॅमच्या मते, डेमोक्रॅट्सना एआय कचरा वाटतो, त्यामुळे ते त्याच्या नादाला लागले नाहीत.
मात्र दुसऱ्या बाजूला रिपब्लिकन्स म्हणजे मूर्खांचा बाजार असल्यामुळे एमिली हार्टला चांगली प्रसिद्धी मिळाली. सॅमने एआय टूल्सचा वापर करून नग्न फोटोही तयार केले आणि त्याची सबस्क्राइबर्सना विक्री केली. “मी काहीही चुकीचे केले नाही. लोकांना जो कंटेट हवाच होता, तो मी पुरवला”, आपल्या कामाचे समर्थन करत असताना सॅमने हा युक्तीवाद केला.
