फगाणिस्तानवर तालिबान्यांनी केलेल्या आक्रमणाचे पडसाद जगभरात उमटू लागले आहेत. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर जगभरात चिंतेंच वातावरण आहे. आपापल्या देशाच्या राजदूतांना तसंच नागरिकांना वाचवण्यासाठी अनेक देशांनी प्रयत्न करत त्यांना तेथून बाहेर काढले जात आहे. अशातच अफगाणिस्तानात तालिबानी सरकारच्या स्थापनेनंतर भारताशी त्यांच्या संबंधांबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, दोहा येथील कतारमधील भारतीय राजदूताने तालिबानचे सर्वोच्च नेते शेर मोहम्मद स्टानेकझाई यांची भेट घेतली. पहिल्यांदाच भारत आणि तालिबान यांच्यात औपचारिक बैठक झाली आहे.

भारतीय राजदूत दीपक मित्तल यांनी दोहा येथील तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांची भेट घेतली. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, तालिबानने भेटण्यासाठी ही विनंती केली होती. दोहा येथील भारतीय दूतावासात दोन्ही प्रतिनिधींची ही भेट झाली. या दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा झाली.

या व्यतिरिक्त, ज्या अल्पसंख्यांक अफगाण नागरिकांना भारतात यायचे आहे. त्यांच्याबद्दल चर्चा झाली. मंत्रालयाने म्हटले आहे की, मित्तल यांनी अफगाणिस्तानची भूमी भारताविरुद्ध कोणत्याही प्रकारच्या दहशतवादी कारवायांसाठी न वापरण्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याच वेळी, तालिबान प्रतिनिधीने हा प्रश्न सकारात्मक पद्धतीने सोडवला जाईल, असे आश्वासन दिले.

भारतासोबतच्या संबंधांबद्दल तालिबानने पहिल्यांदा दिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यापर्वी तालिबानचे नेते शेर मोहम्मद अब्बास स्टानेकझाई यांनी त्यांच्या संघटनेला भारतासोबत अफगाणिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक संबंध पूर्वीप्रमाणेच टिकवायचे आहेत असे म्हटले आहे. तालिबानच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सदस्याने या विषयावर उघडपणे मत व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ आहे. शनिवारी तालिबानच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड करण्यात आलेल्या ४६ मिनिटांच्या व्हिडिओमध्ये अफगाणिस्तानमधील युद्ध संपवण्याची तालिबानची योजना आणि अफगाणिस्तानमधील शरिया आधारित इस्लामिक शासन याविषयी स्टानेकझाई यांनी तपशीलवार माहिती दिली.

हेही वाचा- भारत पाकिस्ताननं आपसात लढत बसावं, आम्हाला मधे पडण्यात रस नाही!; तालिबाननं स्पष्ट केली भूमिका

पश्तोमध्ये बोलताना, स्टानेकझाई यांनी तालिबानच्या जवळच्या क्षेत्रातील प्रमुख देश, भारत, पाकिस्तान, चीन आणि रशिया यांच्याशी संबंधांबद्दलचा दृष्टिकोन सांगितला. तालिबानने १५ ऑगस्ट रोजी काबूल ताब्यात घेतल्यानंतर आणि अश्रफ घनी सरकारच्या पडल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते झबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानी माध्यम वाहिन्यांवर भारताशी असलेल्या संबंधांबद्दल संघटनेचे मत मांडले आहे. तर, इतर देशांशी असलेल्या संबंधांबाबत निवेदन देणारे स्टानेकझाई हे पहिले ज्येष्ठ नेते आहेत. भारत या खंडासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हाला भारतासोबत पूर्वीप्रमाणे सांस्कृतिक, आर्थिक आणि व्यापारी संबंध राखायचे आहेत असे स्टानेकझाई म्हणाले.