मिराज-२००० फायटर जेटचा नवाकोरा टायरच चोरट्यांनी केला लंपास; ट्रॅफिक जाममध्ये साधली संधी!

मिराज २००० फायटर जेटचा टायरच चोरीला गेल्याची अजब घटना लखनौमध्ये घडली असून त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.

mirage 2000 tyle stolen in lucknow
प्रातिनिधिक छायाचित्र (फोटो-पीटीआय)

सिनेमांमध्ये चोरीच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. पण लखनौमध्ये एक खरीखुरी बॉलिवुड स्टाईल चोरी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. आणि या चोरीमध्ये सोनं-चांदी किंवा रोकड वगैरे चोरी झालं नसून थेट भारताच्या मिराज-२००० या फायटर जेटचा नवा कोरा टायरच चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे ट्रॅफिक जामचा फायदा घेऊन चोरट्यांनी हा टायर लंपास केला असून त्यासोबत ठेवण्यात आलेल्या रिफ्युलर वेहिकल, बॉम्ब ट्रॉली, युनिव्हर्सल ट्रॉली, जेटचे मेन टायर यांना चोरट्यांनी हात लावलेला नाही. फायटर जेटचा टायर चोरीला गेल्यामुळे या प्रकारामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले असून अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं घडलं काय?

हा सगळा प्रकार घडला २७ नोव्हेंबर रोजी लखनौजवळच्या शाहीन पथ परिसरामध्ये. बक्षी का तालाब परिसरातील एअरबेसवरून जोधपूरच्या दिशेनं एक ट्रक २७ नोव्हेंबर रोजी निघाला. हेम सिंह रावत हे हा ट्रक चालवत होते. त्यांचा ट्रक जवळच्याच शाहीन पथ परिसरामध्ये ट्रॅफिकमध्ये अडकला. ट्रॅफिक व्यवस्थापन करण्यासाठी अवजड वाहनांना एका बाजूला रांगेत उभं करून एकेक करून सोडण्यात येत होतं. पण चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत फायटर जेटचा नवा कोरा टायर लंपास केला.

कशी झाली चोरी?

हेम सिंह रावत यांनी यासंदर्भात पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून चोरी नेमकी कशी झाली, याचा घटनाक्रम पोलिसांनी नमूद केला आहे. हेम सिंह रावत ट्रकमधून फायटर जेटचे नवे कोरे स्पेअर पार्ट्स जोधपूरला घेऊन जाण्यासाठी निघाले. ट्रक शाहीन पथ परिसरात आल्यानंतर ट्रॅफिक जाममध्ये अडकला. यावेळी ट्रकमध्ये सहा टायर होते. आशियाना परिसरामध्ये त्यांचा ट्रक ट्रॅफिकमध्ये उभा असताना अचाकन बाजूने जाणाऱ्या एका व्यक्तीने काही लोक ट्रकवर लोड असलेल्या समानाशी छेडछाड करत असल्याचं सांगितलं.

काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आणि टायर…!

ड्रायव्हिंग सीटवरून उतरून मागे जात असताना त्यांना एक काळ्या रंगाची स्कॉर्पिओ भरधाव वेगाने बाजूने जाताना दिसली. या स्कॉर्पिओचं मागचं दार उघडं होतं आणि त्यातून बाहेर काहीतरी लटकताना दिसत होतं. ट्रकच्या मागच्या बाजूला आल्यानंतर हेमसिंह रावत यांना घडला प्रकार लक्षात आला. सहा टायरपैकी एक टायर चोरट्यांनी लंपास केला होता. टायर बांधलेला नायलॉनचा रोप तुटलेल्या अवस्थेत होता.

हेमसिंह रावत यांनी तातडीने पोलीस कंट्रोल रूमला फोन करून घडला प्रकार सांगितला. यानंतर त्यांची तक्रार लिहून घेण्यात आली. गेल्या १५ वर्षांपासून हे काम करणारे हेमसिंह रावत सांगतात, “अशा प्रकारची घटना माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच घडली आहे.” या ट्रकमध्ये सहा टायर्सशिवाय एक रिफ्युलर वेहिकल, दोन बॉम्ब ट्रॉली, एक युनिव्हर्सल ट्रॉली, एअरक्राफ्टचे सहा नोज टायर, एक सात स्टेपची शिडी, एक पाच स्टेपची शिडी, दोन सीओटू ट्रॉली असं इतरही साहित्य होतं. मात्र, टायर बांधलेली नायलॉनची रोप कापून तो पळवणं चोरट्यांना जास्त सोपं असल्यामुळे त्यांनी ट्रक थांबल्याची संधी साधून तो लंपास केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Indian mirage 2000 fighter jet tire stolen from truck in lucknow pmw