भारतीय मुस्लीम राजकीय अनाथ – मोदीविजयावर ‘गार्डियन’चं संपादकीय

“मोदी फूट पाडणारे व्यक्तिमत्त्व असले तरी नि:संशयपणे करीश्मा असलेली व्यक्ती”

इतिहासातली सगळ्यात मोठी निवडणूक फक्त एका व्यक्तीनं जिंकली, ती म्हणजे नरेंद्र मोदी. असं वर्णन करणाऱ्या इंग्लंडमधल्या गार्डियन या वृत्तपत्रानं आपल्या संपादकीयामध्ये मोदीविजय ही भारतासह जगासाठीच वाईट बातमी असल्याची टिप्पणी केली आहे. मोदीविजयानंतर लगेचच प्रसिद्ध केलेल्या संपादकीयामध्ये गार्डियननं भारतीय जनता पार्टी ही हिंदू राष्ट्रवाद्यांची राजकीय शाखा असून ही चळवळ भारतात वाईट बदल घडवत असल्याचं म्हटलं आहे. मोदींचा भव्य विजय म्हणजे भारताच्या आत्म्याची काळी बाजू असून या दृष्टीकोनाला भारतातले १९.५ कोटी मुस्लीम हे दुय्यम नागरिक वाटत असल्याचा दावा संपादकीयात करण्यात आला आहे. संपादकीयाचं शीर्षकच The Guardian view on Narendra Modi’s landslide: bad for India’s soul असं आहे. भारतीय मुस्लीम हे राजकीय अनाथ असून बहुसंख्य हिंदुंचा पाठिंबा गमावू नये म्हणून राजकीय पक्ष मुस्लीमांकडे पाठ फिरवत असल्याचे मत गार्डियननं व्यक्त केलं आहे.

या निवडणुकीपूर्वी भारताच्या संसदेतील मुस्लीम खासदारांची संख्या २४ किंवा एकूण खासदारांच्या ४ टक्के होती जी अजून घसरणार असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. मोदी हे फूट पाडणारे व्यक्तिमत्त्व असले तरी ते नि:संशयपणे करीश्मा असलेली व्यक्ती असल्याचंही नमूद करण्यात आलं आहे. मोदी हे बदलत्या भारताचा एक भाग असून त्यांचे लक्ष उच्च जाती हिंदू, कॉर्पोरेट क्षेत्राला हवी असलेली आर्थिक प्रगती, सांस्कृतिक रूढीप्रधान, महिलांचा हीन लेखण्यावर व सरकारी यंत्रणेवर नियंत्रण राखणारं असल्याचं मतही नोंदवण्यात आलं आहे. मोदींनी अत्यंत हलगर्जीपणानं भारत पाकिस्तानला युद्धाच्या सीमेवर आणून ठेवलं होतं असा आरोपही करण्यात आला आहे.

भारतीय अर्थव्यवस्था अडखळत असली तरी मोदींचा विजय झाला यात काहीच आश्चर्य नसल्याचं गार्डियननं म्हटलं असून त्यासाठी त्यांनी एका पाहणीचा संदर्भ दिला आहे. एकतंत्री अमलासाठी भारतीय मोठ्या प्रमाणावर अनुकूल असल्याचे २०१७ मधल्या एका पाहणीत आढळल्याचा दाखला देण्यात आला आहे. व्लादिमीर पुतीन यांच्या रशियापेक्षा जास्त, तब्बल ५५ टक्के भारतीयांनी खंबीर नेत्याच्या एकतंत्री राजवटीच्या बाजुने कौल दिला होता असे संपादकीयात नमूद करण्यात आले आहे. विरोधकांबाबत म्हणजे काँग्रेसबाबत मत व्यक्त करताना गार्डियननं हा पक्ष राजकीय स्पर्धेत कमी पडल्याचं म्हटलं आहे. तसंच भारतातल्या गरीबांच्या सातत्यानं संपर्कात असलेल्या प्रगल्भ विरोधकांची गरज असल्याचं मत गार्डियननं नमूद केलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian muslims political orphan guardian editorial

ताज्या बातम्या