ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली आहे. मोहम्मद रहमतूल्ला सय्यद अहमद, असं या व्यक्तीचं नाव आहे. त्याने सिडनी रेल्वे स्थानकावर एका क्लिनरवर चाकूने हल्ला केल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया पोलिसांकडून करण्यात आला आहे. मंगळवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
हेही वाचा – काश्मिरी पंडिताचे दोन मारेकरी चकमकीत ठार; लष्कराचा जवानही शहीद
एएनआय वृत्तसंस्थेने ऑस्ट्रेलियन मीडियाच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद रहमतूल्ला सय्यद अहमद या भारतीय नागरिकाने मंगळवारी रात्री सिडनी रेल्वे स्थानकावर काम करणाऱ्या एका क्लिनरवर चाकूने हल्ला केला. त्यानंतर त्याने ऑबर्न पोलीस ठाण्यात पोहोचत बाहेर उभ्या असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चाकू दाखवत धमकावले. पोलिसांनी त्याला समाजवण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचा समजताच पोलिसांनी त्याच्यावर तीन गोळ्या झाडल्या. या घटनेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, सिडनीतील भारतीय दूतावासाने मोहम्मद रहमतूल्ला सय्यद अहमद हा भारतीय असल्याची पुष्टी केली असून तो तामिळनाडूचा रहिवासी आहे. तो गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहत असल्याचं दुतावासाकडून सांगण्यात आलं आहे. याप्रकरणी ऑस्ट्रेलिया पोलीस आणखी तपास करत आहेत.