Indian Navy Foils pirate attack: पश्चिम हिंदी महासागरात समुद्री चाच्यांचा संभाव्य हल्ला भारतीय नौदलाने हाणून पाडला आहे. महासागरात ‘एमव्ही माशाल्लाह १’ या व्यापारी जहाजाजवळ समुद्री चाच्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्यानंतर भारतीय नौदलाने तात्काळ प्रतिसाद देत संभाव्य हल्ला हाणून पाडला. संशयास्पद हालचाली दिसून येताच नौदलाने व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी ‘आयएनएस कोलकाता’ तैनात केले. भारतीय नौदलाच्या वतीने याबाबत माहिती देण्यात आली आहे.
हिंदी महासागरात नेमकं काय घडलं?
भारतीय नौदलाने एक्सवरुन प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, “पश्चिम हिंदी महासागरात ‘एमव्ही माशाल्लाह १’ या व्यापारी जहाजाजवळ समुद्री चाच्यांच्या संशयास्पद हालचाली दिसून आल्या. संशयास्पद हालचाली आणि संभाव्य धोका लक्षात घेता व्यापारी जहाजाच्या मदतीसाठी तात्काळ ‘आयएनएस कोलकाता’ तैनात करण्यात आले. नौदलाने अजिबात वेळ न दवडता उचललेल्या पावलांमुळे व्यापारी जहाजाची सुरक्षा सुनिश्चित झाली आणि संभाव्य चाचेगिरीचा हल्ला टळला”, असे नौदलाने म्हटले आहे.
नौदलाकडून जलद प्रसिसाद
“सागरी क्षेत्रातील प्रमुख सुरक्षा भागीदार आणि प्रथम प्रतिसादकर्ता म्हणून, व्यापारी जहाजांचे रक्षण करण्यासाठी, समुद्री चाचेगिरीचा सामना करण्यासाठी आणि सुरक्षा पुरवण्यासाठी भारतीय नौदल कटिबद्ध आहे”, असेही नौदलाने एक्सवर फोटो शेअर करत म्हटले आहे.
संभाव्य हल्ला हाणून पाडला
अधिकच्या माहितीनुसार, एडनच्या आखाताजवळ संशयास्पद हालचाली सुरु असल्याची माहिती भारतीय नौदलला मिळाली होती. यानंतर नौदलाने तात्काळ आयएनएस कोलकाता ही युद्धनौका घटनास्थळी तैनात केली. युद्धनौकेवरील हेलिकॉप्टरच्या मदतीने हवाई पाहणी करण्यात आली तसेच, इतर साधनांच्या मदतीने संभाव्य धोक्याची तपासणी करण्यात आली. जलद गतीने देण्यात आलेला प्रतिसाद आणि केलेल्या कारवाईमुळे संभाव्या हल्ला टाळण्यास मदत झाल्याचे नौदलाने म्हटले आहे. दरम्यान, २००८ पासून एडन आखाताच्याजवळ भारतीय नौदल व्यापारी जहाजांवर होणाऱ्या संभाव्य चाच्यांच्या हल्ल्यांपासून संरक्षण देत आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे व्यापरी जहाजांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
